रेमडेसिव्हरचा काळाबाजार कराल तर हाॅस्पीटल फोडू, इम्तियाज जलील यांचा पुन्हा इशारा..

ही वेळ संकटात सापडलेल्या रुग्णांना मदत करण्याची आहे, बेईमानी करून पैसे कमावण्याची नाही.
Mim Mp Imtiaz Jalil Warn Hospitals News Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil Warn Hospitals News Aurangabad

औरंगाबाद : शहरात रेमडेसिव्हरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. शासकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेमडेसिव्हरची इंजेक्शन तेथील कर्मचारीच चोरून बाहेर जास्त किंमतीत विकत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडक भूमिका घेत काळाबाजार करणाऱ्यांना खेटरानं बडवू असा इशारा दिला होता. त्यांनतर काही रुग्णालयात देखील रेमडेसिव्हरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत.  त्यांनी तातडीने हे प्रकार थांबवावेत अन्यथा आणि हाॅस्पीटल देखील फोडू, असा सज्जड दमच इम्तियाज जलील यांनी भरला आहे.

राज्यात व शहरात रेमडेसिव्हरचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत, पण अशा संकटातही काही गिधाडं त्यांचे लचके तोडण्यासाठी टपून बसले आहेत. कालच औरंगाबाद पोलिसांनी रेमडेसिव्हरचा काळाबाजार करणारी टोळी पकडली. त्यांच्याकडून ५ रेमडेसिव्हरचे इंजेक्शन आणि मोबाईल, कार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हे कमी की काय? महापालिकेच्या मेल्ट्राॅन कोविड सेंटरमधून देखील ४९ रेमडेसिव्हरचा अख्खा बाॅक्सच गायब झाल्याचा प्रकार देखील समोर  आला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. केवळ शहरातच नाही तर राज्यात जिथे कुठे इंजेक्शनचा काळाबाजार होईल त्याची माहिती द्या, किंवा त्यांना पकडून आमच्या हवाली करा, त्यांना चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली करू, असेही इम्तियाज यांनी म्हटले होते. त्यानंतर रेमडेसिव्हरचा काळाबाजार करणाऱ्या गिधाडांचे चेहरे लोकांना दाखवा, अशी मागणी त्यांनी औरंगाबाद पोलिसांकडे ट्विटरद्वारे केली आहे.

लाज वाटली पाहिजे..

संकटात असलेल्या रुग्णांना देखील लुटणाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे असा संताप व्यक्त करतांनाच इम्तियाज यांनी पुन्हा एकदा रेमडेसिव्हरचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती व रुग्णालयांना देखील दम भरला आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना आपल्याकडे काही रुग्णालयांच्या बाबतीत देखील तक्रारी आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ही वेळ संकटात सापडलेल्या रुग्णांना मदत करण्याची आहे, बेईमानी करून पैसे कमावण्याची नाही. काही व्यक्ती मेडिकल चालकांना हातीशी धरून रेमडेसिव्हरचा काळाबाजार करत असल्याचे उघड झाले आहे. आता रुग्णालयात देखील असे प्रकार सुरू असल्याची माहिती येत आहे, या रुग्णालयांनी वेळीच सावध व्हावे, असा कुठलाही प्रकार करू नये, अन्यथा आम्ही हाॅस्पीटल फोडायला देखील मागेपुढे पाहणार नाही,अशा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com