तीन महिन्यात लसीकरण करू शकलो, तर तिसऱ्या लाटेची भिती बाळगण्याचे कारण नाही.. - If we can get vaccinated in three months, there is no reason to be afraid of the third wave. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

तीन महिन्यात लसीकरण करू शकलो, तर तिसऱ्या लाटेची भिती बाळगण्याचे कारण नाही..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

अनेक ठिकाणी लस संपल्यानंतर दोन-तीन दिवस ती उपलब्ध होत नाही, त्यामुळे लसीकरणाचे काम रखडते.

औरंगाबाद ः केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा तो ही अधिक वेगाने केला, तर तीन महिन्यात आपण संपुर्ण लसीकरण करू शकू. ते जर झाले तर आपल्याला तिसऱ्या लाटेची भिती बाळगण्याचे कारण नाही, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. (If we can get vaccinated in three months, there is no reason to be afraid of the third wave.) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण टोपे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण मोहिम, तिसऱ्या लाटेची शक्यता यासह अन्य विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. (Health Minister Rajesh Tope) केंद्रांकडून लसींचा पुरवठा होत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, पण त्याचा वेग वाढवण्याची गरज असल्याचेही टोपेंनी सांगितले.

टोपे म्हणाले, लसीकरण हेच कोरोनावर मात करण्याचे कवचकुंडल आहे. त्यामुळे वेगाने लसीकरण करण्यावर राज्य सरकारचा भर आहे, त्यासाठीची संपुर्ण यंत्रणा देखील आपण सज्ज ठेवलेली आहे. (Maharashtra Health Department) परंतु केंद्राकडून अखंडित लस पुरवठा केला जात नाही, त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागतो. आधीपेक्षा लसींचा पुरवठा केंद्राने वाढवला आहे, परंतु राज्याच्या क्षमतेपेक्षा अजूनही तो कमीच आहे.

अनेक ठिकाणी लस संपल्यानंतर दोन-तीन दिवस ती उपलब्ध होत नाही, त्यामुळे लसीकरणाचे काम रखडते. परंतु केंद्राने अखंडित लस पुरवठा केला आणि आपण तीन महिन्यात लसीकरण पुर्ण करू शकलो, तर तिसऱ्या लाटेची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यातील आरोग्य केंद्रासाठी आपण याआधी पाचशे रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत, त्यात आणखी पाचशेची भर लवकरच पडणार आहे.

राज्यात एक हजार रुग्णवाहिका..

त्यामुळे राज्यात आता एक हजार नव्या रुग्णावाहिका उपलब्ध होणार आहेत. त्याचा लाभ निश्चितच रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचवण्यासाठी होणार आहे. विशेषतः गरोदर महिलांना वेळेत उपचार मिळतील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आणि त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगतिले जात असल्यामुळे सर्वच जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाशल्यचिकित्सकांनी आयसीयु बेड आणि इतर सर्व सुविधा आपापल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये करून ठेवल्या आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने कमी होत आहे. आजघडीला राज्यात साडेआठ हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. रुग्ण संख्या कमी झालीी असली तरी आपल्याला योग्य ती काळजी आणि कोरोनाचे नियम हे पाळावेच लागणार आहेत, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सावधानतेचा इशाराही टोपे यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा ः विधानसभेचा अध्यक्ष काॅंग्रेचाच, आघाडीत मतभेद नाहीत..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख