पंच्याऐंशी दिवसानंतरही साष्टपिंपळगांव येथील आंदोलन सुरूच, अनेकांची प्रकृती बिघडली.. - If something bad happens to the protesters in Sashti Pimpalgaon, the government is responsible | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

पंच्याऐंशी दिवसानंतरही साष्टपिंपळगांव येथील आंदोलन सुरूच, अनेकांची प्रकृती बिघडली..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

आम्हाला त्यांच्यावर विश्वास नव्हता म्हणूनच आम्ही उपोषण आणि आंदोलनावर ठाम राहिलो. आज अनेक आंदोलकांची प्रकृती चिंताजनक आहे.

औरंगाबाद ः मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगांव येथे  गेल्या ८५ दिवसांपासून  उपोषण आंदोनल सुरू आहे. मात्र सरकारने केवळ आश्वासनांवर बोळवण करून हे आंदोनल दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री, जिल्ह्याचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

हिवाळ्यात सुरू झालेले हे आंदोलन तीन महिने झाले तरी सुरू आहे. आंदोलन मागे घ्यावे म्हणून राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावून घेतले. अर्धा तास चर्चा केली, आमच्या मागण्या योग्य आहेत, आपण यावर लवकरच निर्णय घेऊ असा शब्दही दिला. पण केवळ वेळ मारून नेण्याचे काम या दोन्ही नेत्यांनी केले.

आम्हाला त्यांच्यावर विश्वास नव्हता म्हणूनच आम्ही उपोषण आणि आंदोलनावर ठाम राहिलो. आज अनेक आंदोलकांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासनाकडून देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. राज्यकर्ते, मराठा समाजातील नेते देखील गप्प आहेत. केवळ मराठा पेटून उठला तर असे होईल, तसे होईल म्हटले जाते. पण दुर्दैवाने मराठा समाज पेटून उठत नाही हे स्पष्ट झाले आहे.

तर राजीनामे द्यावे लागतील..

पण आमचा हा लढा समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. स्वार्थासाठी नाही, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही. आंदोलकांचे काही बरे वाईट झाले तर त्याला सरकार, मुख्यमंत्री व नेते जबाबदार राहतील, असा इशारा देखील आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.

आम्ही हक्काचे आरक्षण मागतो आहे, भीक नाही. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. पण मराठा आरक्षणाच्या लढ्यात जर कुणाचा जीव गेला तर तुम्हाला मात्र राजीनामे देऊन घरी बसावे लागेल, असा इशाराही आंदोलनकांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टपिंपळगांव येथे गेल्या ८५ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सुरूवातीला राज्यभरातून मराठा नेते, मंत्री लोकप्रतिनिधी, आमदार या आंदोलनस्थळी आले होते, भाषण केली, पण अजूनही आंदोलकांच्या मागण्यांवर विचार सरकारकडून केला गेला नाही. हे  उपोषण सुटावे यासाठी सरकारी पातळीवरून कुठलाच निर्णय किंवा हालचाली सुरू नाही. पण काहीही झाले तरी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख