शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळाला नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पीकविमा देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता.
Bjp Mla Ranajagjeet singh paitl- Farmer Crop Insurance News
Bjp Mla Ranajagjeet singh paitl- Farmer Crop Insurance News

उस्मानाबाद ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी केवळ ७१ हजार शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा न मिळाल्यास जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजतो आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले जात असतांना भाजप आमदार राणा पाटील यांनी देखील या मुद्याकडे लक्ष वेधत मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.

आमदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. कृषिमंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात अंशतः ही बाब खरी असल्याचे सांगितले. दरम्यान पाटील यांनी सभागृहात कृषीमंत्री भुसे यांना या संदर्भात जाब विचारला. चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल महसुल विभागाने दिलेला असताना हे नुकसान अंशतः असल्याचा कांगावा म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच असल्याचे ते म्हणाले.

सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून विमा कंपन्यांना पाठीशी घालण्याचे पाप करीत आहे. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पीकविमा देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे आपणाला हे का जमत नाही, असा सवालही पाटील यांनी केला. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील साडेनऊ लाख शेतकरी खातेदारांनी विमाहप्ता भरला. मात्र, केवळ ७१ हजार शेतकऱ्यांनाच विमा कंपनीने पीकविमा दिला आहे.

६४० कोटी रुपयांच्या विमा हप्त्याचा भरणा केल्यानंतर केवळ ८७ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातून फक्त एका हंगामात विमा कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डावलून तब्बल साडेपाचशे कोटींचा नफा पदरात पाडून घेत आहे. हा सर्व प्रकार राज्य सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी आघाडी सरकारची विमा कंपनीला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com