विश्विजित कदम कॅबिनेट मंत्री होणार..! मग सतेज पाटलांचे काय? - The idol of Vishwajeet Kadam is small, but the glory is great; They will be promoted soon | Politics Marathi News - Sarkarnama

विश्विजित कदम कॅबिनेट मंत्री होणार..! मग सतेज पाटलांचे काय?

लक्ष्मीकांत मुळे
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

अशोक चव्हाण यांनी  विश्वजीत कदम हे राज्यमंत्री मंडळातील सर्वात तरुण व सुपरफास्ट मंत्री आहेत. राज्यमंत्रीपद ते चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत, असे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच (कै)  शंकरराव चव्हाण व (कै) पतंगराव कदम यांचे चांगले संबंध होते, हे ही सांगितले. या दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांचे कौतुक केले. पण विश्विजत कॅबिनेट होणार असतील तर सतेज पाटलांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अर्धापूर : मराठवाड्यात एक यशस्वी साखर उद्योग म्हणून राज्यात ओळख असलेल्या भाऊराव कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाला उपस्थित असलेले सहकार, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे लवकरच प्रमोश होणार, अशी आनंदाची बातमी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. विश्वजीत कदम यांची मूर्ती लहान, पण किर्ती आणि काम महान असल्याचे गौरवोद्दगार देखील चव्हाण यांनी यावेळी काढले.

कॉँग्रेसमध्ये एक वजनदार नेते म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. दोन वेळेस त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. कदम यांच्या प्रमोशनाचा विषय त्यांनी काढल्याने या विधानाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. राज्यमंत्री म्हणून चांगले काम करत असलेले कदम यांचे प्रमोशन होऊन ते कॅबिनेट मंत्री झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात कॉँग्रेसचे बळ वाढण्यासाठी मदत होणार आहे.

गेल्या पाच वर्षात केंद्रात राज्यात कॉँग्रेसचे सरकार नव्हते. गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार आले. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात कॉँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची व नेत्यांच्या वारसांची मंत्रीपदी वर्णी लागली. त्यात डॉ. विश्वजित कदम यांचा समावेश आहे. कॉँग्रेसमध्ये (कै.) पतंगराव कदम यांचे खूप मोठे वजन होते. ते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत सतत चर्चिले जात असत. त्यांनी मंत्रीमंडळात अनेक महत्वाची खाती सांभाळली होती. त्यांच्या कार्याचा वारसा विश्वजित कदम पुढे नेत आहेत.

भाऊराव सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वजीत कदम उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात (कै) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाचा, जलसिंचनाच्या कामांचा विशेष  उल्लेख केला. तसेच युवक कॉँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी अशोक चव्हाण यांचे सहकार्य लाभल्याचे आवर्जून सांगत कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना कॉँग्रेसचे सर्वात जास्त आमदार निवडून आले होते. त्यांनी शेतक-यांसाठी कर्जमाफी केल्याचा उल्लेखही  कदम यांनी केला. माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी  विश्वजीत कदम हे राज्यमंत्री मंडळातील सर्वात तरुण व सुपरफास्ट मंत्री आहेत. राज्यमंत्रीपद ते चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत, असे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच (कै)  शंकरराव चव्हाण व (कै) पतंगराव कदम यांचे चांगले संबंध होते, हे ही सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात (कै) पतंगराव कदम यांनी शैक्षणिक, साहित्य आदी विविध क्षेत्रांत भरीव असे काम केले आहे. तोच वारसा त्यांचे पुत्र विश्वजीत पुढे नेत आहेत. मूर्ती लहान असली तरी किर्ती व काम महान आहे, असे म्हणत कदम यांचे लवकरच प्रमोशन होईल, असेही चव्हाण म्हणाले. त्यांच्या प्रमोशनचा विषय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच काढल्याने आघाडी सरकारकमधील काॅंग्रेसच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सतेज पाटील, विश्वजित कदम असे तरुण चेहरे राज्यमंत्री आहेत. सतेज पाटील हे दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. तसेच ते आमदार म्हणूनही कदम यांना ज्येष्ठ आहेत. कोल्हापुरात काॅंग्रेसचे नेतृत्त्व करतात. कदम यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असेल तर त्या आधी आपला घोडा सतेज पाटील पुढे दामटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या या अंदाजानंतर काॅंग्रेसमधील घडामोडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख