मराठवाडा रेल्वे प्रश्नासाठी मी आणि इम्तियाज जलील सोबत काम करू ः डाॅ. कराड - I will work with Imtiaz Jalil for Marathwada railway issue: Dr. Karad | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा रेल्वे प्रश्नासाठी मी आणि इम्तियाज जलील सोबत काम करू ः डाॅ. कराड

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

खासदार इम्तियाज जलील यांनी शिवाजीनगगर येथील भुयारी मार्गासाठी राज्य सरकारने आपला हिस्सा देण्यास मंजुरी दिल्याचे जाहीर करत यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे म्हटले होते.

औरंगाबाद ः मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नावर भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांनी केंद्र व राज्य सरकारशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. औरंगाबादेत पीटलाईन, रेल्वे भुयारी मार्ग, उड्डाणपूल, औरंगाबाद ते पुणे नगर मार्गे दुहेरी रेल्वेमार्ग यासाठी कराड यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपुर्वी शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रश्न आपण मार्गी लावल्याचा दावा एमआयएमचे खासदार इ्म्तियाज जलील यांनी केला होता. त्यानंतर डाॅ. कराड हे देखील रेल्वे प्रश्नावर समोर आल्याने या दोन खासदारांमध्ये कुरघोडी, श्रेयवादाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भागवत कराड यांनी मराठवाडा विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नासाठी आपण करत असलेल्या पाठपुराव्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. रेल्वेमंत्री पीयुष गोयल, रेल्वे बोर्डाचे सीईओ सुनीत शर्मा, दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्लया यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रांची माहिती देखील कराड यांनी यावेळी दिली.

कराड यांनी मराठवाड्यातून राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वेचे जाळे विस्तारण्यात महत्वाची ठरणारी पीटलाईन औरंगाबादेत व्हावी ही प्रमुख मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे केली आहे. याशिवाय शहर व जिल्ह्यात पाच ठिकाणी भूयारी मार्ग तसेच उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव देखील संबंधित विभागाला दिला आहे. या शिवाय नांदेड-मनामाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण या गेल्या अनेक वर्षांच्या मागण्यांना देखील उजाळा दिला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ औरंगाबादेतून होण्याची शक्यता देखील कराड यांनी वर्तवली.

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवाजीनगगर येथील भुयारी मार्गासाठी राज्य सरकारने आपला हिस्सा देण्यास मंजुरी दिल्याचे जाहीर करत यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे म्हटले होते. या भूयारी मार्गामुळे दोन लाख लोकांना दिलासा मिळणार असल्याचा दावा करतांनाच त्यांनी रेल्वे आणि राज्य सरकारचे आभार मानले होते.

त्यानंतर आज डाॅ. कराड यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजीनगर भुयारी मार्गासह इतर कामांची माहिती आणि त्यासाठी सुरू असलेला पाठपुरावा याची माहिती दिली. त्यामुळे रेल्वेच्या होणाऱ्या कामाचे श्रेय इम्तियाज जलील यांना जाऊ नये, आपण देखील रेल्वे प्रश्नावर कसे काम करत आहोत, हे दाखवण्यासाठीच डाॅ. कराड यांनी पत्रकार परिषद घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या संदर्भात त्यांना छेडले तेव्हा मात्र इम्तियाज जलील लोकसभेत तर मी राज्यसभा आणि राज्य सरकार यांच्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे कराड यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासकामात आम्ही राजकारण आणणार नाही, मी आणि इम्तियाज जलील दोघे मिळून सोबत काम करू, असेही कराड यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख