करुणा मुंडेंचा बचाव : मी देवाचे दर्शन करण्यासाठी आले होते... हा माझा गुन्हा आहे काय?`

माझ्याबाबतीत काहीही होऊ शकतं, हे मी आधीच सर्व यंत्रणांना कळवलं होतं, असा दावा करुणा मुंडे यांनी केला
करुणा मुंडेंचा बचाव : मी देवाचे दर्शन करण्यासाठी आले होते... हा माझा गुन्हा आहे काय?`
Karuna Munde

औरंगाबाद : परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा शर्मा (मुंडे) (Karuna Munde-Sharma) यांच्यावर परळी शहर पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटीचा तर त्यांच्या सोबत असलेल्या अरुण मोरे याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आज सकाळी या दोघांनाही अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु करुना शर्मा यांचे वकील अॅड.तिवारी हे मुंबईहून निघालेले असल्यामुळे कोर्टात वेळेत पोहचू शकले नाही. तेव्हा करुना शर्मा यांनी स्वतःच आपली बाजू मांडली.

हिंदीत बोलतांना `मै तो भगवान के दर्शन करने आयी थी, क्या मुझे दर्शन करने का हक नही है. मैने कोई भी गुन्हा नही किया है, मुझे फसाया जा रहा है, मेरे पे जो आरोप लगाये गैए है उसका कोई सबुत है क्या? असे म्हणत शर्मा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. (Karuna Sharma-Munde, Beed) दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने शर्मा यांना न्यायालयीन तर मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

करुना अशोक शर्मा उर्फ करुना धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपुर्वी परळीत येऊन पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. (Minister Dhnanjay Munde) सोशल मिडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही खुलासे पुराव्यासहित करण्याचा दावा करुणा यांनी केला होता. त्यामुळे शर्मा परळीत येणार का? आल्या तर त्या काय खळबळजनक खुलासा करणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

जाहीर केल्याप्रमाणे करुणा शर्मा आपला मुलगा व अरुण मोरे याच्यासह दुपारी दोन वाजेच्या सुमारास परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिराजवळ दर्शन घेण्यासाठी थांबल्या तेव्हा तिथे उपस्थित महिलांशी त्यांचा वाद झाला. करुना शर्मा यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात व अरुण मोरे याने चाकूने मारहाण केल्याच्या आरोपावरून खूनाचा प्रयत्न या कलमाखाली असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

करुना शर्मा यांना पोलिस ठाण्यात नेत असतांनाच त्यांच्या गाडीत एक गावठी पिस्तुल सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पिस्तुल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या सगळ्या घटनाक्रमानंतर परळी पोलिसांनी शर्मा, अरुण मोरे या दोघांना अटक करून आज अंबाजोगाई न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, शर्मा यांनी मुंबई येथील अॅड. तिवारी यांना अंबाजोगाईत बोलावले होते. परंतु ते वेळेत पोहचू शकले नाही.

या प्रकरणावर सुनावणी सुरू करण्यात आली तेव्हा न्यायालयाने करुना शर्मा यांना वकीला संदर्भात विचारले, पण माझे वकील वेळेत पोहचू शकले नाही, असे करुना यांनी सांगितले तेव्हा, तुम्हाला सरकारी वकील हवायं का? अशी विचारणा करण्यात आली. मात्र करुणा यांनी त्यास नकार देत स्वतःच बाजू मांडणार असल्याचे सांगितले.

हिंदीतून आपली बाजू मांडतांना करुना शर्मा म्हणाल्या, मै एक औरत हू, मै यहाॅं किसी को नुकसान पहुचाने नही, बल्की भगवान का दर्शन करने आयी हू. क्या ये मेरा गुन्हा है, मै कही भी दर्शन को जा नही सकती क्या? मुझे फसाया जा रहा है, मैने कोई गुन्हा नही किया, मुझ पे जो आरोप लगाये गये है, उसके कोई सबुत नही है. फिर मुझपे एफआयआर करके मुझे क्यु पगडा गया है, अशी विचारणा करून शर्मा यांनी केली.

राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना कळवून आले..

त्यावर तुमच्या विरोधात फिर्याद आहे, गुन्हा दाखल असल्यामुळे आता तो पुढच्या तपासाचा भाग आहे. यावर मै यहा आने से पहले राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आयजी इन सबको बता के आयी हूॅं. मै परळी जा रही हूॅं, मेरे साथ कुछ भी हो सकता है, ये मैने बताया है, असेही करून शर्मा न्यायालयाला सांगत होत्या. न्यायालयाने करुना शर्मा यांचे म्हणणे ऐकून घेतले.

त्यानंतर सरकारी वकील  अशोक कुलकर्णी यांनी गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, करुना शर्मा यांच्या गाडीत सापडलेले पिस्तुल, अरुण मोरे याने चाकूने केलेला हल्ला याचा तपास, गाडीत पिस्तुल आणण्यामागे काय हेतू होता. करुणा शर्मा यांनी सोशल मिडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेली धमकी याचा तपास करण्यासाठी करुना शर्मा यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

परंतु न्यायालयाने शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावत मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. शर्मा यांचे वकील अॅड.तिवारी हे अंबाजोगाईला पोहचू न शकल्याने त्यांनी केज येथील अॅड.गलांडे यांना वकीलपत्र दिले आहे. आता उद्या करुना शर्मा यांच्या वतीने जमीनासाठी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in