I don't know how three years have passed, but now every day is difficult | Sarkarnama

तीन वर्ष कशी गेली कळले नाही, पण आता प्रत्येक दिवस कठीण

विकास गाढवे
रविवार, 3 मे 2020

जिल्ह्यात काम करतांना चांगला अनुभव आला. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात मी तीन वर्षापूर्वी रूजू झालो.

लातूर : कोरोनाचा मुकाबला करण्यात रात्रीचा दिवस करणाऱ्या प्रशासनाच्या टीमचे नेतृत्व करणारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सध्या रोजचा वार लक्षात रहात नाही. कोणी तरी सांगितले तरच याची आठवण येते. याच काळात २९ एप्रिल रोजी त्यांना जिल्ह्यात रूजू होऊन तीन वर्ष पूर्ण झाले. याचीही आठवण कोणी तरी दुसऱ्या दिवशी करून दिली, तेव्हा तीन वर्ष कशी गेले कळले नाही. मात्र, महिन्यापासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस अवघड जात असल्याची, प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यात जिल्ह्यातील सगळी प्रशासकीय यंत्रणा सध्या झटते आहे. तहान-भूक याचे भान देखील अनेकदा कामाच्या व्यापात हरवून जाते. त्यामुळेच जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्ष पुर्ण झाल्याची आठवण श्रीकांत यांना राहिली नाही. सहकाऱ्यांनी याची आठवण करून देताच ते जुन्या आठवणीत रमले.

 महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. दिवस कसा गेला कळत नाही, त्यामुळे जिल्ह्यात रूजू होऊन तीन वर्ष पूर्ण झाल्याची आठवण देखील मला राहिली नाही. तीन वर्ष उलटून गेली तरी तीन दिवसच झाल्यासारखे वाटते. जिल्ह्यात काम करतांना चांगला अनुभव आला. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात मी तीन वर्षापूर्वी रूजू झालो.

रूजू होताच पाणीटंचाई व दुष्काळाचा सामना करावा लागला. दुष्काळमुक्त लातूर जिल्ह्यासाठी तीन वर्षात विविध उपक्रम राबवले. या उपक्रमाला लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ते यशस्वी झाले. तीन वर्षातील प्रत्येक दिवसाची एक नाही तर अनेक आठवणी आहेत. माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी खूप सहकार्य केले व सुचना करून उपक्रमासाठी मदत केल्याचा श्रीकांत यांनी आवर्जून उल्लेख केला.

लोकांसाठी सुरू केलेल्या सर्व उपक्रम व अभियानाला पाठिंबा मिळाला, त्यामुळे  तीन वर्षातील दिवस कसे गेले कळालेच नाही. मात्र, गेल्या महिन्यापासून प्रत्येक दिवस अवघड जात आहे. प्रत्येक दिवशी काय होते, किती पॉझिटिव्ह, किती निगेटिव्ह रूग्ण येतात, याचीच चिंता असते. फार कठीण कालावधीत प्रशासन काम करत आहे. हा काळ सुलभ करण्यासाठी प्रत्येकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

लातूरचे वेगळे वैशिष्ट्य

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उदगीरचा अपवाद सोडला तर एक जिल्हा म्हणून लातूरने चांगले काम केले. जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी भरीव काम सुरू आहे. यासाठी प्रत्येक उपक्रमाला लोकांनी प्रतिसाद दिला. अॅँटी कोरोना पोलिस हा उपक्रम राज्यभर गाजला. अॅंटी कोरोना फोर्सचा उपक्रम सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपक्रमात तेरा हजार जवानांनी सहभाग देऊन विक्रम केला. हे लातूरचे वेगळे वैशिष्ट्य आहे. माझ्या खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाचे सर्व उपक्रम यशस्वी झाले, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख