साहेबांच दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही.. गोपीनाथ गडावरील कार्यक्रम रद्द

३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खासदार प्रीतम ताई ह्या परळी येथेच आहेत, त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन लाईव्ह करतील
pankaja munde post on facebook news
pankaja munde post on facebook news

बीड : कोरोनाचे सकंट आणि वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदनी ३ जून रोजी गोपीनाथ गडावर होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनावर दगड ठेवून साहेबांच दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही, अशी भावनिक पोस्ट फेसबुकवर करत पंकजा मुंडे यांनी आपण या दिवशी परळीला येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून देखील साजरी केली जाते. दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक तसंच राजकीय कार्यक्रमांवर बंदी असल्याने गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार असून कुणीही दर्शन घेण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, काल बीड जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि ३ जूनच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांच्याशी चर्चा होत होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. मला १ जूनला प्रवासाची परवानगी मिळाली पण लॉकडाऊन होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे की, माझा ३ जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा. 

कारण मी जरी लोकांना आवाहन केलं असलं तरी मी येणार हे माहित असल्याने पोलिसांचा अंदाज आहे की, त्या ठिकाणी स्थानिक व इतर जिल्हयातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील आणि त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येईल. नियमांचा भंग होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे नियमाप्रमाणे मला जिल्हाधिकारी यांनी विनंती केली की, माझी आज १ जूनची जी परवानगी होती आणि मी सकाळी परळीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे, तो प्रवास रद्द करावा.

लोक माझं अनुकरण करतील मी घरी राहिले तर घरी थांबतील पण मी निघाले तर अश्या स्थितीत प्रश्न निर्माण होईल. मी एक जबाबदार नागरिक, मंत्री राहिलेली आहे आणि मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते, हा विचार करून तसेच लोकांची काळजी म्हणून ३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खासदार प्रीतम ताई ह्या परळी येथेच आहेत, त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन लाईव्ह करतील. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, जे मला फोन करत आहेत ताई, तुम्ही कधी निघताय, कधी निघताय.. पनवेल, नवी मुंबई, पुणे, शिक्रापूर, नगर, जामखेड, पाथर्डी, आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड सगळीकडचे लोक आम्ही निघतोय असे म्हणत आहेत. 

त्या सर्वांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी मी जशी आपल्याला सूचना केली आहे, त्याप्रमाणे घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. कशी साजरी करायची याबद्दलचे सर्व डिटेल्स लवकरच देईन आणि आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया.. मुंडे साहेब जरी आज असले असते तरी त्यांनी प्रशासनाचा मान राखला असता. एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या कारणासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती. पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अगदी मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com