गद्दारी मी नाही, सत्तारांनीच केली: डोणगावंकरांचा पलटवार - I am not a traitor, only the Sattar did it: Dongaonkar's retaliation | Politics Marathi News - Sarkarnama

गद्दारी मी नाही, सत्तारांनीच केली: डोणगावंकरांचा पलटवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

चुकीचे ऐकून घेण्याऱ्यांपैकी मी नाही, मी स्वाभीमानी आणि खानदानी कार्यकर्ता आहे. माझी क्षमता व अनुभव असताना एवढ्या मोठ्या संस्थेवर मला डावलून  सत्तार यांनी स्वतःच्या स्वार्थाला महत्त्व दिले.

औरंगाबाद ः जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा बॅंकेचे संचालक कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्यावर गद्दारीचा आरोप केला होता. या आरोपाला तीन दिवसांनी डोणगांवकर यांनी उत्तर देत पलटवार केला आहे. गद्दारी मी नाही, तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीच केली, असे डोणगांवकर यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिवसेनेते झालेले मतभेद, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे यांनी राज्यमंत्री सत्तार यांच्या विरोधात भूमिका घेत कृष्णा पाटील डोणगांवकर यांना पाठिंबा दर्शवला होता. शेवटी सत्तार यांची सरशी होऊन त्यांचे कट्टर समर्थक अर्जून गाढे हे उपाध्यक्ष झाले.

शिवसेनेतील हा वाद आता शमला असे वाटत असतांनाच, कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पलटवार केला आहे. सत्तार यांनी केलेला गद्दारीचा  आरोप जिव्हारी लागल्याने डोणगांवकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे या आरोपाचे खंडण करत सत्तार हेच गद्दार असल्याचे म्हटले आहे.

आपल्या खुलाशात डोणगांवकर म्हणतात, नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मी उमेदवारी अर्ज भरला होता. माझ्या उमेदवारीवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला. माझ्या बाबतीत गद्दारी सारखे शब्द वापरून त्यांनी माझी बदनमाी केली आहे. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. 

अब्दुल सत्तार यांच्या गद्दारीबाबतच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. कारण मी या निवडणुकीमध्ये त्यांच्या पॅनेलमधून निवडून आलेलो नाही. प्रस्थापितांच्या विरोधातल्या पॅनलकडून मी विजयी झालेलो आहे. त्यामुळे माझ्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारी वरून  आरोप करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही व त्यांचा संबंध देखील नाही. 

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या पॅनलच्या संचालकाला मदत करण्याऐवजी डाॅ. कल्याण काळे, सुभाष झाबंड यांनी भाजप व प्रस्थापित विरोधकांना मदत केली. मी  रोहयो  मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठिंब्यावर उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता. 

 जिल्हा परिषदेतील प्रकार सत्तारांच्या आदेशानेच .

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडी बाबत सत्तारांना बोलायचे असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया किंवा मोर्चेबांधणी महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वी सुरू झाली होती. सत्तार यांच्या मतदारसंघातील श्रीराम महाजन हे भाजपला जाऊन मिळालेले होते. त्यांना राष्ट्रवादी, इतर व  कल्याण काळे समर्थक नाहीत अशा सदस्यांना सोबत घेऊन भाजपचा अध्यक्ष करायचा होता. अशा प्रकारची व्यूहरचना झाली होती.  ही व्यूहरचना फोडून काढण्यासाठी सत्तार यांनी मला पुढे केले.

मला कामाला लावून भाजप व काही अपक्ष लोकांना जवळ घेतले. त्यामुळे श्रीराम महाजन यांचा डाव फसल्यामुळे ते  शेवटी काँग्रेसच्या गोटात गेले, नसता तिथे भाजपचा अध्यक्ष झाला असता. शेवटी ज्या दिवशी जि.प. अध्यक्ष निवडायचा त्या दिवशी ही जागा काँग्रेसला जाहीर झाल्यामुळे माझ्या पत्नीला अध्यक्षपदासाठी उभे केले.  त्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचे दुसरे कारण म्हणजे मी जि.प. अध्यक्षपदाची प्रक्रीया सुरू झाल्यापासून स्वतःला गुंतवून घेउन मोर्चेबांधणी केली होती.

मी स्वाभीमानी, चुकीचे ऐकून घेणार नाही..

त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रीया सुरू होईपर्यंत आम्ही बरेच पुढे निघून गेल्यामुळे माघार घेणे शक्य नव्हते. या सगळ्याला अब्दुल सत्तार हेच जबाबदार होते, त्यांच्या निर्देशाने व नेतृत्वाखालीच ते घडले हे जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे गद्दारी केलीच असेल तर ती मी नाही तर सत्तारांनी केली हे ही त्यांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी समजून घेतले पाहिजे.

चुकीचे ऐकून घेण्याऱ्यांपैकी मी नाही, मी स्वाभीमानी आणि खानदानी कार्यकर्ता आहे. माझी क्षमता व अनुभव असताना एवढ्या मोठ्या संस्थेवर मला डावलून  सत्तार यांनी स्वतःच्या स्वार्थाला महत्त्व दिले. सत्तार यांना मी नेता मानत असतांना त्यांनी मला कार्यकर्ता समजू नये हे माझे दुर्दैवच आहे. उपाध्यक्षपदाची उमेदवारी माझ्या शब्दावर मागे घ्या असे ते म्हटले असते तर विचार नक्की केला असता. आता माझ्यावर चुकीचे व बिनबुडाचे आरोप करू नये, ही माझी त्यांना विनंती आहे, असेही डोणगांवकर यांनी म्हटले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख