मी अभिमन्यू आहे, कोरोनाचे चक्रव्युह भेदणारच..

मी कधीच कुणाचा फोन टाळत नाही, पण सध्या डॉक्टरांनी फोनवर बोलूच नका, असे सांगितले आहे. पण माझ्या प्रकृतीची काळजी तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही मला फोन कराल, आणि मी तो उचलला नाही तर तुम्हाला राग येईल, म्हणून मी फेसबुक लाईव्ह घेण्याचे ठरवले.
mla abhimanyu pawar facebook live news
mla abhimanyu pawar facebook live news

औरंगाबादः कोरोनामुळे त्रास होतो, पण घाबरण्याचे काम नाही, लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या, स्वतःला कुटुंबापासून वेगळ ठेवा असे आवाहन करतांनाच, असले दहा कोरोना मी पालथे घालीन, माझे नाव अभिमन्यू आहे, त्यामुळे कोरोनाचे चक्रव्युह मी भेदणारच, असा विश्वास औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केला. कोरोनाची लागण झाल्यामुळे पवार आपल्या मुलासह लातूरच्या विलासराव देशमुख सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत.

अभिमन्यू पवार यांना तीन तारखेनंतर ताप आल्यामुळे त्यांनी आपली व कुटुंबाची कोरोना चाचणी करुन घेतली होती. अहवालानंतर त्यांना व मुलगा परिक्षीत यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. सुदैवाने कुटुंबातील इतर सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यांनतर अभिमन्यू पवार व त्यांच्या मुलगा उपचार घेत आहेत. दरम्यान, प्रकृतीची चौकशी करणारे असंख्य मेसेज आणि फोन आल्यामुळे पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समर्थकांशी संवाद साधला.

अभिमन्‍यू पवार म्हणाले, मी लॉकडाऊनच्या काळात बऱ्यापैकी काळजी घेतली, घराबाहेर पडलो नाही. पण जेव्हा लोकांना अन्नधान्य मिळत नाहीये, किराणा सामानाचे कीट मिळत नाहीये यासह अन्य समस्या समजल्या तेव्हा मला राहवले नाही, आणि मी घराबाहेर पडलो. शेवटी लोकांनी मला निवडूण कशासाठी दिले याचा विचार करून मी स्वतःची काळजी घेत लोकांना शक्य ती मदत केली.

सतत मास्क घातला, सॅनिटायजर वापरले. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून मी दोन दिवस अज्ञातस्थळी निघून गेलो होतो. पण परतल्यानंतरही काही लोक शुभेच्छा देण्यासाठी आले. अर्थात माझ्यावरील प्रेमापोटीच ते आले, पण त्या दरम्यानच कुठेतरी मला कोरोनाचा संसर्ग झाला की काय? असे वाटायला लागले.

दोन-तीन दिवस औषधी घेऊनही ताप कमी होत नसल्याने अखेर मी स्वॅब देऊन चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि माझी शंका खरी ठरली. मला आणि मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. कोरोनाला घाबरण्याची अजिबात गरज नाही, पण हा रोग होऊच नये याची काळजी मात्र प्रत्येकानी घ्यावी, असे आवाहनही अभिमन्यू पवार यांनी यावेळी केले.

लातूरच्या विलासराव देशमुख रुग्णालयात मी उपचार घेत असतांना मला असंख्य हितचिंतकांचे फोन आले. मी कधीच कुणाचा फोन टाळत नाही, पण सध्या डॉक्टरांनी फोनवर बोलूच नका, असे सांगितले आहे. पण माझ्या प्रकृतीची काळजी तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही मला फोन कराल, आणि मी तो उचलला नाही तर तुम्हाला राग येईल, म्हणून मी फेसबुक लाईव्ह घेण्याचे ठरवले.

लातूरात चांगले उपचार..

मी मुंबईला उपचारासाठी का गेलो नाही? असेही मला विचारले जाते. पण मी सांगू इच्छितो की इथे तीनशे रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून योग्य काळजी घेतली जात आहे, रुग्णांना वेळेवर औषधी, चहा, नाश्ता जेवण, काढा दिला जातो. मला येथील डॉक्टर आणि रुग्णसेवेवर पुर्ण विश्वास आहे, आणि म्हणून मी इथेच उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

तुम्ही देखील ताप आला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने तपासणी करून घ्या. आपल्यापासून दुसऱ्याला संसर्ग होऊन नये यासाठी, स्वतःला आयसोलेट करून घ्या. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मी कोरोनावर मात करून बरा होऊन येणारच आहे, असा विश्वास देखील अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com