गृहखात्यापेक्षा महावितरणची वसुली जोरात; बिलांची होळी अन् सरकारच्या नावाने बोंब मारणार

मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडून अशी जुलमी वसुली कधी करण्यात आली नव्हती.
Bjp Mla Sambhji Patil Nilangekar- Minister Nitin Raut News Latur
Bjp Mla Sambhji Patil Nilangekar- Minister Nitin Raut News Latur

निलंगा : राज्य सरकार हे महावसूली सरकार असून नागरिकांकडून वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. या वसुलीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने होळीच्या दिवशी वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या होळीचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नावाने बोंबा मारो आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी वीज बीला संदर्भात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निलंगेकर म्हणाले,  कोविड-१९ काळात अनेक महिने दुकाने व व्यवसाय बंद होते. त्यामुळे अनेकांची रोजीरोटी बंद पडली. मात्र या काळातही महावितरणने वीजबिले दिली. भरमसाठ बिलांमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्यांना बिल भरणे शक्य नाही.

साध्या केस कर्तनालयासारख्या दुकानदारांना लाखोंची बिले आली आहेत. काही ठिकाणी वीज जोडणी देण्यापूर्वीच वीज बिले पाठविली आहेत. यामुळे सामान्य नागरिक संकटात असल्याने या सरकारच्या विरोधात २८ तारखेला होळी पौर्णिमेच्या दिवशी आंदोलन केले जाणार आहे. सरकारच्या नावाने बोंबा मारून वीज बीलांची देखील होळी केली जाणार आहे. 

राज्यभरातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करत घरातच हे आंदोलन करावे असे आवाहनही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. महावितरण कंपनीने पाठवलेल्या वाढीव विज बीलाची होळी करून त्याचे फोटो निषेध म्हणून सोशल मिडीयावर व्हायरल करावे, तसेच  सरकारलाही पाठवावे असेही निलंगेकर म्हणाले. 

शेतकऱ्यांकडून जुलमी वसुली

गृहखात्याच्या माध्यमातून महिन्याला १०० कोटी रूपयांचा वसुली करणारे हे सरकार आहे. त्याहीपेक्षा अधिक वसुली वीज खात्याच्या माध्यमातून सरकार करीत असल्याचा आरोप निलंगेकरांनी केला.  अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला असतांनाही विज कनेक्शन तोडले जात आहेत. मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडून अशी जुलमी वसुली कधी करण्यात आली नव्हती.

यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पाणी उपलब्ध असून  महावितरणने वीज तोडल्यामुळे पाणी देता येत नाही. या सरकारला शेतकर्‍यांशी काही देणेघेणे नाही, असा आरोपही निलंगेकरांनी केला. होळीमध्ये बिलांचे दहन करताना सरकारच्या नावाने बोंब मारावी. होळीची धग आणि मारलेली बोंब मुंबईत बसलेल्या सरकार पर्यंत पोहचली पाहिजे, असेही निलंगेकर म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com