साठेबाजी हे भाजपच काम, राष्ट्रवादीला असल्या कामाची गरज नाही.. - Hoarding is BJP's job, NCP does not need it. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

साठेबाजी हे भाजपच काम, राष्ट्रवादीला असल्या कामाची गरज नाही..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

नाही. बेजबादारपणाची वक्तव्य करण्याची आणि साठेबाजीची सवय भाजपला असेल. राष्ट्रवादी असे काम करत नाही.

मुंबई ः राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सोलापूरात वाटप करण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन हे प्रशासना मार्फतच मोफत वाटण्यात आले होते. तिथे जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित होते. या संदर्भात मी आधीही स्पष्टीकरण दिले आहे. साठेबाजी भाजप करते आहे, आमच्या पक्षाला त्याची गरज नाही, राष्ट्रवादी असले काम करत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रवीण दरेकर यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले होते. राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठेबाजीवरून सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. अंमळनेर येथील भाजप कार्यकर्ते शिरीश चौधरी, आणि मुंबईत ब्रुक फार्माच्या मालकाची झालेली चौकशी यावरून भाजपचे नेते संतापले आहेत.

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर आरोप करतांना आमदार रोहित पवार यांनी सोलापूरात वाटप केलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनवरून हा साठा राष्ट्रवादीकडे कुठून आला याची चौकशी केली का? असा सवाल नवाब मलिक यांना केला. शिवाय रेमडेसेविरच्या नावाखाली पॅरासिटामाॅल गोळ्यांचे पाणी करून ते ३५ हजार रुपयांना विकणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर काय कारवाई केली? अशी विचारणाही दरेकरांनी पत्रकार परिषदेत केली होती.

यावर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत दरेकरांचे आरोप फेटाळून लावले. सोलापूरमध्ये वाटप करण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन हे प्रशासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोफत वाटण्यात  आले होते. त्यामुळे ते कुठून आणले याचा प्रश्नच उद्भवत नाही. बेजबादारपणाची वक्तव्य करण्याची आणि साठेबाजीची सवय भाजपला असेल. राष्ट्रवादी असे काम करत नाही, असा टोला देखील पवार यांनी भाजपला लगावला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये बोलतांना महाराष्ट्रातील ठाकरे सरकार लवकरच कोसळणार असा उल्लेख केला. या संदर्भात विचारले असता, त्यांचे हे विधान मी ऐकलेले नाही. पश्चिम बंगालमध्ये ते बोलले असतील तर महाराष्ट्राचा विषय तिथे ते बोलणार नाहीत. पण जर ते बोलले असतील तर त्यांचे हे विधान राजकीय हेतूने केलेले असावे, असे मला वाटते असे पवार यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख