शिवाजी महाराजांच्या १७५ स्मारकांवर २५ क्विटंल फुलांची हेलीकाॅप्टरमधून उधळण.. - Helicopter scattering 25 quintals of flowers on 175 memorials of Shivaji Maharaj. | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजी महाराजांच्या १७५ स्मारकांवर २५ क्विटंल फुलांची हेलीकाॅप्टरमधून उधळण..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

शिवजयंतीच्या निमित्ताने हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टीचा अनुभव याची देही याची डोळा पाहण्यासाठी कोरोनाचे नियम पाळत शिवप्रेमी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

औरंगाबाद ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, राज्यात रुग्णांची वाढती संख्या अशा वातावरणात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवप्रेमींनी उत्साहात साजरी केली. औरंगाबादेत दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १७५ पुतळे आणि स्मारकांवर हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाचा वाढता धोका आणि रुग्णसंख्या पाहता शिवजयंती मर्यादेत संख्येत आणि नियमांचे पालन करून साजरी करावी, असे आवाहन व सूचना राज्य सरकारच्या वतीने करण्यात आल्या होत्या. शिवप्रेमी जनतेने देखील याला चांगला प्रतिसाद दिला. शहरातील आर.आर. पाटील फाऊंडेशनच्या वतीने याही वर्षी जिल्ह्यातील पावणे दोनशेहून अधिक शिवाजी महाराजांचे पुतळे आणि स्मारकांवर हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टीला कालपासूनच सुरुवात करण्यात आली होती. ग्रामीण भागातील शिवाजी महाराजांचे पुतळे व स्मारकांवर विनोद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी केली. हवेत हेलीकाॅप्टर दिसताच गावागावांतील शिवप्रेमींनी महाराजांच्या नावाचा जयघोष करत पुष्पवृष्टीचा आनंद घेतला.

काल ग्रामीण भागात हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी केल्यानंतर आज शहरातील क्रांतीचौकसह विविध भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यासाठी तब्बल २५ क्विटंल फुले वापरण्यात आली. फुलांच्या पाकळ्यांची पोती तयार करण्यासाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवप्रेमी तरूण झटत होते.

शिवजयंतीच्या निमित्ताने हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टीचा अनुभव याची देही याची डोळा पाहण्यासाठी कोरोनाचे नियम पाळत शिवप्रेमी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. या शिवाय शहार आपापल्या वाहनांवर भगवे झेंडे लावून तरुण शिवरायांच्या नावाचा जयघोष करत होते.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख