कोरोनाने मी रात्रीच येईन, असे प्रशासनाला सांगितले आहे का?..

मी वारंवार बैठकीत अधिकारी आणि माझ्या लोकप्रतिनिधी सहकाऱ्यांना रात्रीच्या संचारबंदीचा हेतू काय? याची विचारणा केली. पण कुणीही उत्तर देऊ शकले नाही. कोरोना आणि प्रशासनामध्ये असा काही करार झाला आहे का? की मी फक्त संध्याकाळी सातनंतरच येणार, दिवसा येणार नाही? मला वाटते हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, यातून काहीही साध्य होणार नाही.
mp imtiaz jalil news
mp imtiaz jalil news

औरंगाबादः प्रशासन गोंधळलेले आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अक्षरशः वेडेपणाचे निर्णय घेतले जात आहेत. सायंकाळी ७ ते पहाटे पाचपर्यंत पुन्हा शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. बहुदा मी रात्री सात नंतर आणि पहाटे पाचपर्यंतच येईन, असा करार कोरोनाने प्रशासनाशी केला आहे की काय? असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला लगावला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या या चुकीच्या निर्णयात लोकप्रतिनिधी देखील सहभागी होत असल्याची टिका देखील त्यांनी केली.

शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दररोज कोरोना रुग्णांचा आकडा दोनशेने वाढतो आहे. मृतांची संख्या देखील वाढत असल्याने प्रशासन प्रचंड हादरले आहेत. यावर करण्यात येत असलेले सगळे उपाय फोल ठरत असल्याने, व पुन्हा कडक लॉकडाऊन करा, असा सूर लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्यांमधून निघाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाळूज औद्योगिक वसाहतीत संपुर्ण संचारबंदी, तर शहरी भागात सांयकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावरून आता पुन्हा लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पहायला मिळत आहे. खासदार इम्तियाज जलील वगळता इतर राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या निर्णयाला पांठिबा दर्शवला आहे. इम्तियाज जलील यांनी मात्र रात्रीच्या संचारबंदीची खिल्ली उडवत प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे वेडेपणा असल्याचे म्हटले आहे.

‘सरकारनामा‘शी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, कोरोना विषाणूंचा संसर्ग फक्त रात्रीच होतो, दिवसा त्याच्यापासून कुणाला धोका नाही  असा प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा देखील समज झालेला दिसतो. जेव्हा जेव्हा प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींच्या बैठका झाल्या, तेव्हा कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय सूचवला गेला. बर दिवसा सूट आणि रात्री संचारबंदी याने काय साध्य होईल, याचे उत्तर ना प्रशासनाकडे आहे, ना आमच्या लोकप्रतिनिंधीकडे.

मी वारंवार बैठकीत अधिकारी आणि माझ्या लोकप्रतिनिधी सहकाऱ्यांना रात्रीच्या संचारबंदीचा हेतू काय? याची विचारणा केली. पण कुणीही उत्तर देऊ शकले नाही. कोरोना आणि प्रशासनामध्ये असा काही करार झाला आहे का? की मी फक्त संध्याकाळी सातनंतरच येणार, दिवसा येणार नाही? मला वाटते हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, यातून काहीही साध्य होणार नाही.

तीन महिन्यांपासून गरीब रिक्षाचालक घरात बसून आहेत, त्यांची कमाई बुडाली, उपासमार होत आहे. पण त्यांना रिक्षाचालवायला परवानगी नाही? कारण काय तर रिक्षात तीन-चार लोक बसतील आणि सोशल डिस्टन्सचे पालन होणार नाही. तोंडाला मास्क लावून जर रिक्षातून वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास नागिरकांनी केला तर त्यांना कोरोना होईल असा दावा, केला गेला.

मात्र विमानात शेजारी बसून दोन-तीन तासांचा प्रवास केलेला यांना कसा चालतो? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. पोलीसी खाक्या दाखवा, रिक्षा रस्त्यावर फिरू देऊ नका, असे अनेक उपाय लोकप्रतिनिधींनी बैठकीत सूचवले, मग रात्रीच्या संचारबंदीने शंभर टक्के कोरोनाचा नायनाट होईल, असे कुणी खात्रीने सांगू शकेल का? याचे उत्तर हो असेल, तर मी ही या निर्णयाला पाठिंबा द्यायला तयार आहे, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.

मी डॉक्टारांच्या विरोधात नाही..

घाटीत रुग्णांना बाहेरून औषधी आणायला सांगितली जातात हे मी पुराव्यानिशी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मांडले होते. घाटीच्या अधिष्ठांतानी देखील ते मान्य केल्यामुळे केवळ गरीबांची लूट थांबावी म्हणून मी हा प्रश्न हाती घेतला. अधिष्ठांताच्या निलंबनाची मागणी केली, तर मी कसा डॉक्टरांच्या विरोधात आहे, असे चित्र निर्माण केले गेले. मी कधीही डॉक्टरांना विरोध केला नाही, उलट त्यांच्या कामाबद्दल आदरच व्यक्त केला. पण यावरून देखील काहीजण राजकारण करत असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com