हर्षवर्धन जाधव पुन्हा अडचणीत; जामीन रद्द करण्यासाठी शासनाची खंडपीठात धाव - Harshvardhan Jadhav in trouble again; Run to government bench to cancel bail | Politics Marathi News - Sarkarnama

हर्षवर्धन जाधव पुन्हा अडचणीत; जामीन रद्द करण्यासाठी शासनाची खंडपीठात धाव

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला होता. मात्र जाधव यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य घडले आहे.

औरंगाबाद ः मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन नेऊन पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर सुटलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा संबंधित जामीन रद्द करावा, यासाठी शासनातर्फे सोमवारी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी हर्षवर्धन जाधव यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर ठेवली आहे.

पुण्यातील वृद्ध दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी दीड महिन्याच्या तुरुंगवासानंतर जामीन मिळालेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी अर्जद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे.

या अर्जानुसार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला होता. मात्र जाधव यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य घडले आहे. विधानसभा निवडणूकीच्या वेळी त्यांच्यावर पिशोर (ता. कन्नड), तसेच क्रांतीचौक पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर नुकतेच पुणे येथील वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे.

तीन गुन्हे दाखल असल्यामुळे जाधव यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज मुख्य सरकारी वकीलांकडून दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात हर्षवर्धन जाधव यांना खंडपीठाने नोटीस बाजवली असून तुमचा जामीन रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.

या प्रकरणात झाली होती शिक्षा..

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ५ जानेवारी २०११ रोजी वेरुळ लेणीला भेट देण्यासाठी आणि शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. मुख्यमंत्र्यांच्या विरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे हे खुलताबाद इदगाह टी पाईंटजवळ वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्री वेरुळ लेणी पाहुन पर्यटन केंद्राकडे निघाल्याने टी पाईंटजवळ वाहतूक थांबवण्यात आलेली होती.

दरम्यान औरंगाबाकडून आमदार हर्षवर्धन जाधव स्वतः वाहन चालवत आले होते. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आमदार जाधव यांनी न थांबता सहाय्यक पोलिस निरिक्षक कोकणे यांच्या अंगावर वाहन घातले. प्रसंगावधान राखत कोकणे यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेऊन जिव वाचवला. दरम्यान सुसाट वेगाने आमदार जाधव हे वेरुळच्या दिशेने निघाले, कोकणे यांनी तातडीने वायरलेसवरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली, व त्यांचा पाठलाग सुरु केला.

पुढे वेरुळ लेणीसमोरील दुसऱ्या अधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांचे वाहन अडवले. त्यावेळी पाठलाग करणारे सहाय्यक निरिक्षक कोकणे हेही लगेचच त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी आमदार जाधव यांनी मी आमदार आहे. ओळखत नाही, काय असे म्हणत शिवीगाळ करत कोकणे यांना मरहाण केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या प्रकरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा व सत्र न्यायधीश आर. आर. काकाणी यांनी दोन कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख