Harshvardhan Jadhav remembered Balasaheb Thackeray | Sarkarnama

हर्षवर्धन जाधवांना झाली बाळासाहेब ठाकरेंची आठवण..

जगदीश पानसरे
शुक्रवार, 3 जुलै 2020

अनेक राजकीय पक्ष समाजकारण करतो असं सागंतात, पण त्यात काही तथ्य नाही. मी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली तेव्हा समाजकारण हाच त्याचा प्रमुख उद्देश होता. पण निवडणूक आयोगाने शिव या शब्दाला आक्षेप घेत माझ्या पक्षाला परवानगी नाकारली. त्यामुळे राजकीय पक्ष न काढता संघटनेच्या माध्यमातून यापुढे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे.

औरंगाबादः शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पक्ष सोडल्यानंतर पुन्हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही राजकारणात मोठे पद उपभोगले नाही, ते कधीही पंतप्रधान, मुख्यमंत्री नव्हते. पण त्यांनी आपल्या समाजकारणातून अनेकांना मुख्यमंत्री, पंतप्रधान केले, त्यामुळेच अनेक मोठ्या पदावरच्या लोकांना मातोश्रीवर सलाम ठोकून जावे लागायचे. राजकारणाशिवाय देखील समाजकारण केले जाऊ शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिले होते. आपण त्यातून बोध घ्यायला काय हरकत आहे.

राजकारणाशिवाय समाजकारण करू, असे सांगत शिवस्वराज्य बहुजन संघटनेच्या माध्यमातून यापुढे समाजकारण करणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. १५ आॅगस्टला या नव्या संघटनेची स्थापना करून सप्टेंबरमध्ये आपण संपुर्ण राज्यात दौरा करून संघटनेची बांधणी करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

अपक्ष, मनसे, शिवसेना, शिवस्वराज्य बहुजन पक्ष, पुन्हा मनसे आणि आता स्वतःची संघटना असा राजकीय प्रवास केलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पुढील वाटचाली विषयीची भूमिका सोशल मिडियाच्या माध्यमातून नुकतीच मांडली. कौटुंबिक वाद, आरोप-प्रत्यारोप, व्हिडिओच्या माध्यमातून पत्नी आणि सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिल्यानंतर जाधव यांनी आता काहीशी नरमाईची भूमिका घेत समाजकारण करण्याच निर्णय घेतला आहे. 

अपक्ष, मनसे, शिवसेना, शिवस्वराज्य बहुजन पक्ष आणि पुन्हा मनसे असा राजकीय आणि तितकाच रंजक प्रवास माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राहिला आहे. राजकीय संन्यास घेऊन पत्नीला आपला राजकीय वारस घोषित केल्यानंतर आता जाधव समाजकारणाकडे वळले आहेत.

यामागची भूमिका स्पष्ट करतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले, माझी बोट बुडते की काय? असे वाटत असतांना मला एक वासुदेव मिळाला आणि कृष्णाला जसे वासुदेवाने नदीच्या प्रवाहातून सुखरूप किनाऱ्यावर नेले होते, तशीच माझी बोट देखील आता किनाऱ्यावर पोहचेल. मध्यंतरीच्या काळात काय घडले हे रवंथ करण्यात आता काही हाशील नाही. राजकारणाशिवाय देखील समाजकारण करता येऊ शकते. त्यामुळे यापुढे शिवस्वराज्य बहुजन संघटनेच्या माध्यमातून मी लोकांची छोटी-मोठी कामे प्रामाणिकपणे करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक राजकीय पक्ष समाजकारण करतो असं सागंतात, पण त्यात काही तथ्य नाही. मी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली तेव्हा समाजकारण हाच त्याचा प्रमुख उद्देश होता. पण निवडणूक आयोगाने शिव या शब्दाला आक्षेप घेत माझ्या पक्षाला परवानगी नाकारली. त्यामुळे राजकीय पक्ष न काढता संघटनेच्या माध्यमातून यापुढे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे.

ज्या कुणाला माझ्या समाजकारणावर शंका असेल त्यांना मी सांगू इच्छितो, चार दिवसाचे सरपंच पद सोडवत नाही अशी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असतांना मी विद्यमान आमदारकी आठ महिनेआधी समाजकारणासाठी सोडली होती. तेव्हा माझ्या समाजकारणावर कोणी शंका घेऊ नये. समाजकारणासाठी आमदारचं असलं पाहिजे असे काही नाही. लोकसभा निवडणुकीत मला जी मत पडली, ती माझ्या समाजकारणामुळेच, पण माझ्यामुळे मुसलमान निवडूण आला हा आरोप बिनबुडाचा असल्याचेही जाधव यांनी सांगितले.  

राजकारण न करताही लोक मोठी होतात..

राजकारण न करताही लोक मोठी होतात, याचे उदाहरण म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्याकडून आपण बोध घेतला पाहिजे. त्यांनी राजकारणात कधी निवडणूक लढवली नाही, ते मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले नाही. पण त्यांनी या पदावर अनेकांना पोहचवलं, कारण लोक त्यांच्यावर प्रेम करत होती. त्यांनी समाजासाठी केलेलं मोठ काम पाहून मुख्यमंत्री, पंतप्रधान देखील त्यावेळी मातोश्रीवर सलाम ठोकून जात होते.

आपल्याला कुणी सलाम ठोकावा अशी अपेक्षा नाही, पण आपणही राजकारणात न राहता लोकांची काम करु शकतो, असा विश्वास हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला. वेळ पडली तर एसटीने जाऊ, गावागावंत संघटना वाढवू आणि समाजकारण करू, असे आवाहन देखील त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख