Harshvardhan Jadhav quits politics, declares his wife as political heir .. | Sarkarnama

हर्षवर्धन जाधव यांनी राजकारण सोडले, पत्नीला घोषित केले राजकीय वारसदार..

जगदीश पानसरे
शनिवार, 23 मे 2020

हर्षवर्धन जाधव यांनी नुकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. आगामी महापालिका निवडणुका पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर शहर- जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील सोपवली होती. पण मध्यंतरीच्या काळात त्यांच्या विरोधात दाखल झालेला अट्रॉसिटीचा गुन्हा, घरगुती वादातून त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्या विरोधात सासूबाई तेजस्वीनी जाधव यांनी पोलीसात दाखल केलेली तक्रार या पार्श्वभूमीवर जाधव सक्रीय नव्हते.

औरंगाबादः लोकसभा निवडणुकीत विक्रमी मते घेत शिवसेनेला दणका देणारे माजी आमदार तथा मनसेचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी आज अचानक सोशल मिडियावरून आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे आपली पत्नी संजना जाधव या आपल्या पुढील राजकीय वारसदार असतील, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तुम्ही त्यांच्‍या पाठीशी उभे राहा असे, आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. जाधव यांच्या अचनाक राजकारणातून निवृत्ती घेण्याच्य निर्णयामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी नुकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. आगामी महापालिका निवडणुका पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर शहर- जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील सोपवली होती. पण मध्यंतरीच्या काळात त्यांच्या विरोधात दाखल झालेला अट्रॉसिटीचा गुन्हा, घरगुती वादातून त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्या विरोधात सासूबाई तेजस्वीनी जाधव यांनी पोलीसात दाखल केलेली तक्रार या पार्श्वभूमीवर जाधव सक्रीय नव्हते. त्यातच कोरोनाचे संकट ओढावले आणि महापालिकेच्या निवडणुका देखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या. लॉकडाऊनच्या काळात हर्षवर्धन जाधव कुठेच दिसले नव्हते.

गेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून हर्षवर्धन जाधव फारसे कुठे दिसलेच नाही. मध्यंतरी त्यांच्या आणि पत्नी संजना जाधव यांच्यातील वाद देखील चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे जाधव हे राजकारणात असून देखील पक्षाच्या अगदीच निवडण बैठक, कार्यक्रमांत दिसले होते. राज ठाकरे यांच्या तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात देखील ते फारसे दिसले नाही. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. यावरून त्यांनी शिवसेनेवर आरोप करत स्थानिक नेत्यांनीच हेतूपुरस्पर आपल्या विरोधात तक्रार द्यायला लावल्याचे म्हटले होते. मात्र काही दिवसांनी त्यांनी आपले सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील अशाच प्रकारचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

आज अचानक सोशल मिडियावर अवतर जाधव यांनी आपण लॉकडाऊनच्या काळात आध्यात्मिक पुस्तके वाचत होतो, असे सांगत राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. ही निवृत्ती जाहीर करत असतांनाच आपली राजकीय वारसदार पत्नी संजना जाधव या असतील असेही स्पष्ट केले. मतदारसंघातील जनतेने कुठल्याही समस्या, शासकीय कामासाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा, माझा त्यांना पुर्णपणे पाठिंबा असून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत आजच्याच दिवशी म्हणजे २३ मे २०१९ रोजी हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला होता. पण या पराभवापेक्षा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचा सर्वाधिक आनंद त्यांना झाला होता. त्यानंतर कन्नड- सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने जाधव यांना पराभूत करत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले होते. राजकारणातून निवृत्ती घेण्यासाठी जाधव यांनी नेमका आजचाच मुहूर्त का निवडला? ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख