Haribhau Bagade says, Tope held a meeting and Corona's patients grew ... | Sarkarnama

बागडे म्हणतात, टोपेंनी बैठक घेतली आणि कोरोना वाढला..

प्रकाश बनकर
शुक्रवार, 22 मे 2020

राजेश टोपे यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. आज जिल्ह्यात बाराशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत, तर चाळीसहून अधिक जणांचे यामुळे जीव गेले आहेत. सरकारला औरंगाबाद शहरातील वाढता रुग्णाचा आकडा रोखता आलेला नाही.

औरंगाबाद : राज्य सरकार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले आहे,  त्यामुळेच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. औरंगाबादेत सुरुवातीला एकच रुग्ण होता, पण २६ एप्रिलला आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेतली आणि दुसऱ्या दिवशीपासून रुग्णांची संख्या वाढल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलना दरम्यान केला.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपतर्फे आज जिल्हा कार्यालयासमोर ‘माझे अंगण हेच रणांगण' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार डॉ.भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केणेकर,  शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी सरकारवर टिका करतांना बागडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा राज्यात फक्त ४० रुग्ण होते. आता कोरोना व्हायरस देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४३ हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. तर साडेचौदाशेहून अधिक जण या महामारीमुळे दगावले आहेत.

औरंगाबाद शहरातही सुरुवातीला एकच रुग्ण होता, पण २६ एप्रिलला औरंगाबादेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. आज जिल्ह्यात बाराशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत, तर चाळीसहून अधिक जणांचे यामुळे जीव गेले आहेत. सरकारला औरंगाबाद शहरातील वाढता रुग्णाचा आकडा रोखता आलेला नाही, म्हणूनच सरकारचा आम्ही निषेध करत असल्याचे बागडे यांनी माध्यमांना सांगितले.

सरकार तर्फे नागपूरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे, सांगण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झालेली नाही. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज मिळाले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असल्याचा आरोप करतांनाच अजूनही ४० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे. शरद पवार यांनी साखरे संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले. मात्र मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापसाविषयी कुठलेच पत्र राज्यातील मंत्र्यांना लिहिले नसल्यचा टोला देखील बागडे यांनी लगावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख