पालकमंत्र्यांनी बाहेर पडून निलंगा किंवा बाभळगावच्या बांधावर यावे... - Guardian Minister should come out and come to Nilanga or Babhalgaon | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्र्यांनी बाहेर पडून निलंगा किंवा बाभळगावच्या बांधावर यावे...

हरी तुगावकर
शुक्रवार, 29 मे 2020

 बांधावर खत दिला जात असल्याचे सांगितले जाते. पण यात तीनशे ते पाचशे रुपये जास्त घेतले जात आहेत. याच्या तक्रारी वाढत आहेत. कृषी विभाग मात्र कागदावरची माहिती देऊन दिशाभूल करतो आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बोहर पडून खरी परिस्थिती काय आहे? हे जाणून घेणे गरजे आहे.

लातूरः जिल्ह्यात बियाणांचा तुटवडा आहे, बांधावर खत देण्याच्या योजनेत शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. पण पालकमंत्र्यांना कृषी विभाग चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतो आहे.  पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, तेव्हा  वस्तुस्थिती काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी बाहेर पडून बांधावर यावे, असे आवाहन माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. हे आवाहन करत असतांनाच बाभळगावचा किंवा निलंग्याचा बांध घ्या, असा चिमटाही त्यांनी काढला.

निलंगेकर यांनी शुक्रवारी झूम ॲपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी मांडत पालकमंत्री अमित देशमुख यांना टोला लगावला. खरीप हंगाम जवळ येत आहे. कृषी विभाग कागदोपत्री आकडेवारी दाखवून मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहे, पालकमंत्र्यांना देखील तीच माहिती दिली जात आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. खत, बियाणांचा तुटवडा, यातून बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता असल्याचा मुद्दा निलंगेकरानी उपस्थित केला.

प्रशासनाचे या सगळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत निलंगेकर म्हणाले,  बांधावर खत दिला जात असल्याचे सांगितले जाते. पण यात तीनशे ते पाचशे रुपये जास्त घेतले जात आहेत. याच्या तक्रारी वाढत आहेत. कृषी विभाग मात्र कागदावरची माहिती देऊन दिशाभूल करतो आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बोहर पडून खरी परिस्थिती काय आहे? हे जाणून घेणे गरजे आहे. यासाठी त्यांनी बांधावर यावे, शेतकऱ्यांच्‍या प्रश्नावर ते जर गंभीर नाही झाले, तर शेतकरी अडचणीत येणार आहे. बाभळगाव किंवा निलंग्याच्या बांधावर सर्व लोकप्रतिनिधीना घेवून बैठक घ्या, अशी सूचनाही निलंगेकरांनी यावेळी केली.

बाहेरून आलेल्यांचे स्क्रीनिंग करा..

टाळेबंदी चारमध्ये पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहून लोक येत आहेत. ते आपलेच आहेत , पण सध्याचे कोरोना रुग्ण पाहता ते सर्व बाहेरून आलेलेच आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, माझा गावा कोरोनामुक्त राहावा, असे म्हणत बसण्यापेक्षा बाहेरून आलेल्या प्रत्येकाची स्क्रिनिंग तपासणी केली जावी, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असेही निलंगेकरांनी सूचवले. तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती पिक कर्ज दिले जात आहे, हे जाहिर करावे. शेतकऱ्यांना तलावातून काळी माती नेण्याची परवानगी द्यावी, असे सांगतानाच दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात लातूर जिल्हा परिषद देशात दुसरी असल्याची माहितीही निलंगेकरांनी यावेळी आवर्जून दिली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख