मराठवाड्यात संधी मोठी पण तीन जिल्ह्यांनी राष्ट्रवादीला रोखले.. - Great opportunity in Marathwada but three districts stopped the NCP | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाड्यात संधी मोठी पण तीन जिल्ह्यांनी राष्ट्रवादीला रोखले..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सातत्याने वावर आणि संपर्क असून देखील या पक्षाला जिल्ह्यात मजबूतीने आपले पाय रोवता आलेले नाही, हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही.

औरंगाबाद ः  राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना पुर्ण करण्याला आज २२ वर्ष पुर्ण झाली आहेत.  काॅंग्रेस सोबत आघाडी करत राष्ट्रवादीने राज्यात पंधरा वर्ष सत्ताही भोगली. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र  विदर्भ आणि मराठवाड्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने या भागात राष्ट्रवादी भक्कमपणे उभी आहे. (Great opportunity in Marathwada but three districts stopped the NCP) मराठवाड्याचा विचार केला तर इथे पक्षाला मोठी संधी असली तरी औरंगाबाद, नांदेड आणि लातूर या तीन महत्वाच्या जिल्ह्याली राष्ट्रवादीला रोखल्याचे चित्र आहे.

राज्यात सर्वाधिक १०५ आमदार निवडून आलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसवून तीन पक्षांचे आघाडी सरकार अनेक संकटांचा सामना करत खंबीरपणे वाटचाल करते आहे, त्याचे श्रेय देखील राष्ट्रवादीच्या साहेबांनाच जाते. (Ncp Leader Sharad Pawar) २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची राज्यात मोठी पडझड झाली. अनेक वर्ष सत्ता, मंत्रीपद उपभोगलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली, यात मराठवाडाही मागे नव्हता. उस्मानाबाद जिल्ह्यातील पद्मसिंह पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीसाठी मराठवाड्यात हा मोठा धक्का होता, नव्हे मराठवाड्यातील ज्या उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी सर्वात मजबुत होती, तो जिल्हा आज राष्ट्रवादीमुक्त झाल्याचे चित्र आहे. (22nd anniversary of NCP)  अर्थात पद्मसिंह, राणाजगजीतसिंह पाटील यांचा भाजप प्रवेश म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. आज उस्मानाबाद व मराठवाड्यातील राष्ट्रवादीचा विचार केला, तर अजूनही राष्ट्रवादीला पुर्ण मराठवाडा व्यापता आलेला नाही. बीड,जालना, उस्मानाबाद, परभणी हे चार जिल्हे वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी अजूनही चाचपडतांना दिसते आहे.

मराठवाड्याची राजधानी औरंगाबादचा विचार केला, तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे असले तरी ते अनुक्रमे मराठवाडा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जिल्ह्यातील राष्ट्रवादी बळकट होण्यास फारसा उपयोग होऊ शकला नाही. (There is not a single MLA representing the district in the Assembly today.) परिणामी आज विधानसभेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा एकही आमदार नाही. महापालिका, जिल्हा परिषदेत देखील राष्ट्रवादीची ताकद दोन अंकी आकडा गाठू शकलेली नाही. नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये देखील यापेक्षा वेगळे चित्र नाही.

औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सातत्याने वावर आणि संपर्क असून देखील या पक्षाला जिल्ह्यात मजबूतीने आपले पाय रोवता आलेले नाही, हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यस्तरावरील नेते या न त्या निमित्ताने शहरात येत असतात. तेव्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी देखील होते. पण मग निवडणुकीच्या वेळी नेमकं काय होतं हा खरा प्रश्न आहे. संघटना बळकट करण्यासाठी अनेक संघटनात्मक बदल देखील केले गेले, परंतु हा प्रयोग देखील फारसा यशस्वी ठरलेला नाही.

त्यामुळे औरंगाबाद सारख्या महत्वाच्या शहरात राष्ट्रवादीला कात टाकावी लागेल. राज्यात असलेल्या सत्तेचा काही फायदा आगामी महापालिका, जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कसा करून घेता येईल, यासाठी स्थानिक व राज्यातील नेत्यांनी जोरकस प्रयत्न केले, तर राष्ट्रवादीची स्थिती जिल्ह्यात काहीशी सुधारू शकते.

जालन्यात पक्षवाढीत स्पीडब्रेकर..

औरंगाबादला लागून असलेल्या जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस बऱ्यापैकी बळकट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत जिल्ह्याला राजेश टोपे यांच्या निमित्ताने पुन्हा मंत्रीपद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची चांगली गर्दी पक्षाकडे दिसते. परंतु जिल्ह्यातील एकमेका सहाय्य करू या राजकारणाच्या पद्धतीमुळे जालना शहरात जिल्हा परिषद, नगरपालिकेत टोपे यांना विरोधकांशी हातमिळवणी करावी लागते.

त्यामुळे जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ते असली तरी राष्ट्रवादी बॅकसीटवर असते. टोपे यांच्या मंत्रीपदामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे, एवढे मात्र निश्चित. याच मंत्रीपदाच्या जोरावर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कक्षा रुंदावण्यासाठी टोपे प्रयत्नशील आहेत.

परभणीत फटका..

तिकडे परभणीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या स्थितीत असलेल्या राष्ट्रवादीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चांगलाच फटका बसला. औरंगाबाद प्रमाणेच परभणीत राष्ट्रवादीची पाटी कोरी आहे.  महापालिकेत सत्तेत असले तरी तिथे फ्रंटसीटवर काॅंग्रेसच आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत देखील काॅंग्रेसने बाजी मारत सत्ता राखली. बाबाजाणी दुर्राणी यांनी भाजपशी हातमिळविणी करत थेट अध्यक्षपद मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

परंतु राज्यात आघाडी असल्यामुळे आघाडी धर्म पाळण्याचे आदेश त्यांना वरिष्ठांकडून आले, आणि त्यांचा प्रयत्न फसला. पाथरी नगर परिषदेतील सत्ता वगळता परभणीत देखील राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे दिसते. विधान परिषदेत दुर्राणी यांच्या रुपाने तर राज्यसभेत फौजिया खान यांना संधी मिळाल्याने हे दोघे तिथे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. पण राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात वाढवण्याचा दृष्टीने या दोघांकडून देखील फारसे प्रयत्न होतांना दिसत नाहीत.

पडझडीनंतरही बीडमध्ये भक्कम..

बीड हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा मराठवाड्यातील सर्वात मजबूत गड म्हणून ओळखला जातो. उस्मानाबाद प्रमाणेच राष्ट्रवादीत मंत्रीपद भोगलेले जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्याचा फारसा परिणाम पक्षावर झाला नाही. राज्याच्या सत्तेत असल्यामुळे पक्षाने धनंजय मुंडे यांना मंत्रीपद व ताकद देत जिल्ह्यावरील पकड अधिक घट्ट केली.

परळी विधानसभेतील विजय, बीड जिल्हा बॅंकेतील भाजपची सत्ता उलथवून तिथे प्रशासक नेमण्याची मुंडे-पंडीत यांची यशस्वी झालेली खेळी यामुळे सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची चलती आहे. जिल्हापरिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील राष्ट्रवादी मजबुतीने उभी आहे. जिल्ह्याला मंत्रीपद असल्याने अनेक विकासकामे वेगाने मार्गी लागत आहेत. भाजपला क्षीण करण्यासाठी धनंजय मुंडे यांना अधिक बळ देण्याचे धोरण वरिष्ठ नेत्यांनी ठेवल्यामुळे त्याचा लाभ देखील पक्षाची पाळेमुळे आणखी घट्ट होण्यासाठी निश्चितच होत आहे.

उस्मानाबाद राष्ट्रवादीमुक्त..

कधीकाळी संपुर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र सध्या राष्ट्रवादीची स्थिती काहीशी बिकट झाली आहे. राष्ट्रवादी म्हणजे राजापाटील असे समीकरण गेल्या कित्येक वर्षात रुढ झाल्यामुळे आणि त्यांनी पक्ष सोडल्याने इथे नव्या आणि खमक्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. आज नगरपालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक असले तरी ते मनाने मात्र भाजपमध्ये असल्याचे चित्र आहे.

पक्षाचा व्हिप देखील हे नगरसेवक झुगारत असल्यामुळे सध्या राष्ट्रवादीची जिल्ह्यात चांगलीच गोची झाली आहे. माजी आमदार राहूल मोटे हे राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असून देखील अडगळीत पडल्या सारखे आहेत. तर राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अजूनही जिल्ह्यात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचा या घडीला एकही आमदार नाही, त्यामुळे राष्ट्रवादीला इथे पुर्ववैभव मिळवण्यासाठी पुन्हा जोर लावावा लागणार आहे. 

चव्हाण-देशमुखांनी रोखले..

नांदेड-लातूरमध्ये सुरूवातीपासूनच काॅंग्रेसने राष्ट्रवादीला डोके वर काढू दिले नव्हते. पक्ष स्थापनेच्या २२ वर्षानंतर देखील या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. लातूरात देशमुख आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला रोखून धरले आहे. मराठवाड्यात शक्ती वाढवायची असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या जिल्ह्यांकडे आपले लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा ः महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही; अजित पवारांचा रोख कुणाकडे?

 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख