गोयल यांना पदभार न देता परत पाठवले; परभणीकरांचा सोशल मिडियावर संताप..

जिल्ह्यात आलेल्या कडक शिस्तीच्या, नियमाप्रमाणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना नेहमीच काटेरी रस्त्यावरुन चालावे लागते.
गोयल यांना पदभार न देता परत पाठवले; परभणीकरांचा सोशल मिडियावर संताप..
Parbhani Collector return without Charge News

परभणी ः परभणीचा नामोल्लेख उपहासात्मकरित्या 'जगात जर्मणी अन् भारतात परभणी' असा केला जातो. त्याची प्रतिची पुन्हा एकदा आली. जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या एका महिला अधिकाऱ्यावर परत जाण्याची वेळ आली. (Goyal was sent back without charge; Parbhanikars upset.) त्याबद्दल समाजमाध्यमातून प्रचंड संताप व्यक्त होत असून संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याची नाचक्की झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची राज्यशासनाने नियुक्ती केली होती. त्यासाठी त्या दोन-तीन दिवस अगोदरच शहरात दाखल झाल्या होत्या. (Parbhani Collector Deepak Mugalikar Retierd)३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पदभार गोयल यांच्याकडे सोपविणे अपेक्षीत असतांना अतिशय धक्कादायक प्रकार घडला.

शासन आदेशानुसार त्यांनी कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोपवला. यामुळे समाज माध्यमावर तर या निर्णयाविरोधात संताप आणि निषेध केला जात आहे. ताटाखालचे मांजर झालेले अधिकारी पाहिजेत का?, यांना फक्त वसुली अधिकारीच हवेत, अशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

अधिकाऱ्यांचा कार्यकाळ अपूर्णच 

जिल्ह्यात आलेल्या कडक शिस्तीच्या, नियमाप्रमाणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना नेहमीच काटेरी रस्त्यावरुन चालावे लागते. यापुर्वी देखील अशा अनेक अधिकाऱ्यांवर अनेकांनी मनस्तापाची वेळ आणली आहे. परंतु काही खमक्या अधिकाऱ्यांनी त्यांना न जुमनता अंगावर घेतले. अलीकडच्या काळातील प्रतिनिधीक स्वरुपात विचार करता जिल्हाधिकारी एस.पी. सिंग, पी. शिवशंकर, आयुक्त राहुल रेखावार, बी.पी. पृथ्वीराज हे आयएएस अधिकारी तर काही आयपीएस अधिकारी  नियमावर बोट ठेवत असल्यामुळे त्यांना अनेकवेळा अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले.

तर काहींच्या सत्ताधारी शासनाने जिल्ह्याच्या विकासाचा कुठलाही विचार न करता केवळ आणि केवळ काहींची मर्जी  राखण्यासाठी कार्यकाळ पूर्ण करण्यापुर्वीच बदल्या केल्या. एकतर जिल्ह्यात असे अधिकारी येण्यास धजावत नाहीत. आलेच तर त्यांना अडचणीत आणण्याचे, बदनामी करण्याचे, काहींना त्यांच्या अंगावर सोडण्याचे प्रयत्न केले जातात. तर आयएएस व आयपीएस पदांवर बहुतांश वेळा पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या आपुलकीने आणले जाते.

असे अधिकारी लगेचच गळ्यातील ताईत बनतात. त्यांचा मात्र कार्यकाळ तर पूर्ण होतोच परंतु कार्यकाळ वाढवून मिळावा, यासाठी देखील ते वजन वापरत असल्याचे दिसून आले आहे. असाच काहीचा प्रकार महापालिकेत देखील घडला आहे. सेवानिवृत्तीस दोन महिने असतांना  येथेच सेवानिवृत्ती अपेक्षीत असतांना एका आयुक्तांची नुकतीच झटपट बदली करण्यात आली.

प्रमोटेड अधिकारीच का ?

आयएएस, आयपीएस संवर्ग पदांवर पदोन्नती झालेलेच अधिकारी जिल्ह्याला पसंत का करतात? अनेकवेळा हे अधिकारी हा जिल्हा मागून घेतात, नाहीतर कुणीतरी त्यांच्यासाठी वजन वापरते, असे बोलले जाते. जिल्ह्यात आल्यानंतर हे अधिकारी आपले मोठे प्रस्थ निर्माण करीत असल्याचे देखील चित्र असते.

परंतु  गोयल यांच्याबाबतीत घडलेला प्रकार पूर्णतः भिन्न आहे. एक तर त्यांची नियुक्ती झाली होती, पदभार घेण्यासाठी त्या आल्या देखील होत्या. मग शासनस्तरावर अशी कोणती घटना घडली की, त्यांना पदभार न देताच परत बोलावण्यात आले, याची उत्सुकता व संताप देखील नागरिकांमध्ये आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in