राज्यपालांनी पक्षासारख्या बैठका घेऊ नये; राष्ट्रवादी काळे झेंडे दाखवणार ...

थेट जिल्ह्यात जाऊन आढावा बैठक घेणे हे चुकीचे असून यामुळे राज्यात दोन संमातर यंत्रणा काम करत असल्याचे चित्र निर्माण होऊ शकते.
Ncp Warn-Governor Koshyari News Parbhani
Ncp Warn-Governor Koshyari News Parbhani

परभणी ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मराठावाडा दौरा चांगलाच वादात सापडला आहे. मुंबईत काल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या नांदेड, हिंगोली आणि परभणी दौरा आणि त्या दरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. (Governors should not hold party-like meetings; NCP to show black flags)

राज्यात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासवण्याचा हा राज्यपालांचा प्रयत्न आहे का? असा सवाल देखील मलिक यांनी उपस्थित केला होता. (Governor Bhagatsinh Koshyari, Maharashtra) त्यानंतर आता परभणीत राष्ट्रवादीने राज्यपालांनी प्रोटोकाॅल मोडून राजकीय पक्षांप्रमाणे बैठका घेऊ नये, अन्यथा काळे झेंडे दाखवू, असा इशारा दिला आहे.

त्यामुळे राज्यपालांचा परभणीसह तीन जिल्ह्यांतील दौऱ्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद आणि संघर्ष काही केल्या संपतांना दिसत नाहीये, उलट तो वाढतांनाच दिसतो आहे. विधान परिषदेच्या बार आमदारांच्या नियुक्त्या असो की मग राज्यातील इतर प्रश्न, कोश्यारी यांनी नेहमीच राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. आता तर उद्धाटनाच्या कार्यक्रमाला जातांनाच तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील ते घेणार आहेत.

कोश्यारी हे ५ ते ७ आॅगस्ट दरम्यान मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी तीनही ठिकाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या असून ते त्यांच्याकडून आढावा घेणार आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे, राज्यातील कुठल्याही विषयाची माहिती त्यांना राज्याचे सचिव, मुख्यमंत्री यांच्याकडून मिळू शकते. असे असतांना थेट जिल्ह्यात जाऊन आढावा बैठक घेणे हे चुकीचे असून यामुळे राज्यात दोन संमातर यंत्रणा काम करत असल्याचे चित्र निर्माण होऊ शकते.

यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. राज्यपाल मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर आता परभणी येथील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, राज्यपालांनी प्रोटोकाॅल मोडू नये, राजकीय पक्षाप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यास आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com