पोलीस व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यात शासन कमी पडतयं - The government is failing to take care of the police and their families - Meghna Bordikar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

पोलीस व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यात शासन कमी पडतयं

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मार्च 2021

राज्यपालांच्या अभिभाषणात मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठींच्या वसतीगृहांचा कुठेही उल्लेख नाही. हा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे.

परभणी : कोरोना काळात आमचे पोलीस बांधव रात्रंदिवस रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत होते. कुटुंबापासून लांब होते, अनेक दिवस त्यांना आपल्या मुला-बाळांना पाहता देखील आले नाही. जीव धोक्यात घालून ड्युटी बजावणाऱ्या पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यात शासन कमी पडल्याची टीका, भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली. तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसहतीसांठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांर बोलतांना मेघना बोर्डीकर यांनी मतदारसंघातील शेतकरी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड कामगार यासह विविध प्रश्नांवर भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी निधी उपलब्ध करून देऊन त्यांची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन शासनाला केले.

मेघना बोर्डीकर म्हणाल्या, गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पीक तर गेलेचं, पण शेतजमीनी देखील खरडून गेल्या. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६३ कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली, परंतु अद्याप हा निधी मिळालेला नाही. तो ताडीने देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. माझ्या मतदारसंघातील सेलू येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची मागणी केली आहे. त्याला देखील मंजुरी मिळाली तर या इमारतीचे काम लवकर सुरू करता येईल.

राज्यपालांच्या अभिभाषणात मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठींच्या वसतीगृहांचा कुठेही उल्लेख नाही. हा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परभणी जिल्ह्यात अशी वसतीगृहे उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देखील बोर्डीकर यांनी केली.

परभणी जिल्ह्यात ऊसतोड कामगार व बंजारा समाजाची संख्या सर्वाधिक असल्याकडे लक्ष वेधतांनाच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वस्तीगृह आणि त्यांच्या तांड्यावर पाणी पोहचवण्यासाठीच्या योजनेला निधी मिळणे गरजेचे असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या.

मेडीकल काॅलेजचा शब्द पुर्ण करा..

राज्यात व विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मेडीकल काॅलेज व रुग्णालयांना मंजुरी दिला जात आहे. परभणीत शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय व्हावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी शासनस्तरावर अनेकदा पाठपुरावा देखील करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परभणीला मेडीकल काॅलेज देण्याचा शब्द दिला होता, याची आठवण करून देतांनाच तो पुर्ण करा आणि मेडीकल काॅलेजला मान्यात द्या, अशी आग्रही मागणी देखील बोर्डीकर यांनी सभागृहात केली.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख