आरोग्यमंत्री म्हणून कमावलेली पुण्याई तुम्हाला कोरोनातून बरी करेल.. - The goodness earned as health minister will cure you from corona. | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्यमंत्री म्हणून कमावलेली पुण्याई तुम्हाला कोरोनातून बरी करेल..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या मित्राबद्दल काळजी व्यक्त करत या आजारातून त्यांनी लवकर सुखरूप बाहेर पडावे यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

औरंगाबाद ः कोरोनाच्या संकट काळात गेली वर्षभर राज्याची काळजी वाहणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच कोरोनाची लागण झाली. काल टोपे यांनी स्वःतच याची माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले. मंत्रीमंडळातील सहकारी असलेल्या टोपेंना कोरोना झाल्याची माहिती कळताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी टोपेंना दिलासा देतांनाच कोरोनाच्या संकटातून तुम्ही लवकर बरे व्हाल, अशा सदिच्छा देणारे ट्विट केले आहे.

मार्च २०२० नंतर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून ते आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असतांना राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली. अगदी आई आजाराशी लढा देत असतांना देखील टोपे यांनी कोरोनाच्या संकटापासून राज्यातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. परंतु आतापर्यंत स्वःताला कोरोनापासून सुरक्षित ठेवणाऱ्या टोपे यांना देखील या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

राजेश टोपे यांनी स्वःतच ही माहिती ट्विट व फेसबुकच्या माध्यमातून दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.

टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळताच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणारे मेसेज आणि त्यांना या आजारातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या मित्राबद्दल काळजी व्यक्त करत या आजारातून त्यांनी लवकर सुखरूप बाहेर पडावे यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 

भैय्या कोरोनाच्या कठीण काळात राज्यातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतलेत. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे राज्याचे लाडके आरोग्यमंत्री म्हणून कमावलेली पुण्याई तुम्हाला या आजारातून सहज बरी करेल ही खात्री आहे.

कोरोनाचा संसर्ग राज्यात दुसऱ्यांदा झपाट्याने वाढतो आहे. लोकांनी योग्य ती काळजी, खबरदारी घेतली नाही, नियमांचे पालन केले नाही तर लाॅकडाऊन लावावा लागेल, असा इशारा टोपे यांनी नुकताच दिला होता. आता त्यांनाच कोरोना झाल्याने त्यांच्या हितचिंतक आणि समर्थकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

यापुर्वी महाविकास आघाडीतील अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अजित पवार, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदार व लोकप्रतिनिधींना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले होते. पण या गंभीर आजारावर मात करत हे सगळेच नेते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू झाले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख