औरंगाबाद ः मोदी सरकारने जाहीर केलेले बजेट हे ऐकायला चांगले परंतु प्रत्यक्षात भ्रमनिरास करणारे असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने, प्रमाणे अर्थमंत्री सीताराम के सपने असे या बजेटला म्हणावे लागेल, असा टोला देखील त्यांनी लगावला.
कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाशी सामना करत लढणाऱ्या देशाचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प कसा असेल, गेल्या जवळपास वर्षभरापासून झालेले आर्थिक नुकसान सरकार कसे भरून काढणार, कुठली नवी धोरण आणणार याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागून होते. मोदी सरकारच्या आजच्याय बजेटनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.
औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या बजेटला सीतारामन के हसीन सपने असे म्हणत खिल्ली उडवली आहे. अनेक सरकारी कंपन्या विकण्यात आल्या आहेत, भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात त्या विकल्या जाणार आहेत. एक अर्थाने सत्ताधाऱ्यांनी देशच विकायला काढला आहे. त्यामुळे कुणाच्याही नोकरीची शाश्वती राहिलेली नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.
इम्तियाज जलील म्हणाले, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, आत्मनिर्भर भारत अशा अनेक छान आणि कानाला ऐकायला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींचा उल्लेख आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. गरीबांना परवडणारे घर हा देखील त्यातील एक भाग आहे. पण प्रत्यक्षात काय घडले हे कोरोनाच्या काळात देश आणि जगाने पाहिले आहे. स्वस्थ भारतची भाषा आपण करतो, पण आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था किती तोकडी आणि अपुर्ण आहे हे कोरोनामुळे झालेल्या हजारो मृत्यूवरून स्पष्ट झाले आहे.
या काळात ज्यांना आपला जीव गमवावा लागला, त्याला सर्वस्वी हे सरकारच जबादार आहे. त्यामुळे कानाला ऐकायला चागंले वाटणारे परंतु प्रत्यक्षात सर्वांचा भ्रमनिरास करणारे हे बजेट आहे. देशातील अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. भविष्यात देखील खाजगी कंपन्यांच्या ताब्यात त्या देण्यात येतील असे सरकारने स्पष्टच केले आहे. त्यामुळे उद्या कुणाचीही नोकरी कायम राहणार नाही, मुळात ती राहिल की नाही? याची देखील शाश्वती देता येत नाही. परिणामी देशात बेरोजगाराची भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. या बजेटमधून कुणाच्याही हाताला काही लागणार नाही, हे निराशाजनक बजेट असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.
भाजप खासदारांना बजेट कळलेच नाही..
आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे, असे असतांना बजेट इंग्रजीत का सादर केले गेले? हा खरा प्रश्न आहे. मला इंग्रजी कळत असले तरी संसदेत असे अनेक खासदार आहेत, ज्यांना इंग्रजी कळत नाही. त्यामुळे सभागृहात काय चालले हे अनेकांना कळालेच नाही, विशेषतः भाजप खासदारांना. अर्थमंत्री बजेट सादर करत होत्या तेव्हा, त्यांना फक्त प्रत्येक दोन मिनिटांनी टाळ्या वाजवायच्या एवढेच सांगण्यात आले होते, आणि ते तसेच करत होते, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला.
Edited By :jagdish Pansare

