Give jobs to Shivchhatrapati Sports Award players in Municipal Corporation | Sarkarnama

शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार खेळांडूना महापालिकेत नोकरी द्या..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

क्रिडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त नामांकित खेळाडूंची दखल घेऊन सांगली, पुणे महानगरपालिकेने त्यांच्या जिल्ह्यातील सदरील विजेत्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग ब, क व ड मध्ये थेट नोकरी दिली आहे.

औरंगाबादः जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट नोकरी द्यावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेला औरंगाबाद महानगरपालिकेचा आकृतिबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यावर महानगरपालिकेत जवळपास तीन हजार पदांसाठी भरती होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना औरंगाबाद महानगरपालिकेत थेट नोकरी द्यावी, अशी मागणी मी २२ जानेवारी २०१९ रोजी औरंगाबाद महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर व तत्कालीन आयुक्तांकडे केली होती. 

आपल्या महानगरपालिकेने ११ डिसेंबर २०१८ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ७६३ नुसार औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विशेष बाब म्हणून महापालिकेत थेट नोकरी देण्याबाबतचा ठराव देखील मंजुर केला होता, याची आठवण देखील सतीश चव्हाण यांनी आपल्या पत्रातून करुन दिली आहे.

क्रिडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त नामांकित खेळाडूंची दखल घेऊन सांगली, पुणे महानगरपालिकेने त्यांच्या जिल्ह्यातील सदरील विजेत्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग ब, क व ड मध्ये थेट नोकरी दिली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासनाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारानंतर या खेळाडूंना मान-सन्मान मिळाला. मात्र अनेक खेळाडूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आपल्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करताना दिसून येत आहेत. सांगली, पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर औरंगाबाद महानगरपालिकेने देखील जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेत्या खेळाडूंना थेट नोकरी देऊन खेळाडूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा, असे देखील सतीश चव्हाण यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख