औरंगाबाद ः शहर `सुपर संभाजीनगर`च्या दिशेने वाटचाल करत आहे. शहराला सुपर संभाजीनगर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादकरांना दिली. शहरातील विविध विकास कामांचे उद्धाटन आणि भुमीपूजन त्यांच्या हस्ते आज करण्यात आले.
महापालिका निवडणुक अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी शहरात शिवसेना नेत्यांचे दौरे वाढले आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री, पर्यटन व पर्यावरण मंत्री यांच्यानंतर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील औरंगाबादचा दौरा केला. आमदार अंबादास दानवे यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला होता.
यातून होणाऱ्या २३ विकास कामांचा शुभारंभ एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे सरकार हे क्रांतिकारी निर्णय घेणारे सरकार आहे. त्यामुळे या शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाला तातडीने मंजुरी देण्यात आली. २०२० पासून पुढील तीस वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करता सर्वांना मुबलक पाणी मिळेल या दृष्टीने पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
यासाठी १६८० कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे, गुंठेवारीत असलेली २०२० पर्यंतची घरे नियमित करण्याचा महत्वाचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. प्रत्येकाला आपले घर बांधता यावे यासाठी परवानगीसाठीच्या अटी-शर्थी शिथील करून त्यामध्ये सुलभता आणण्यात आली आहे.
एमएसआरडीसी, एमआयडीसी, महानगरपालिका यांच्या माध्यमातून १५३ कोटीचे रस्ते शहरात होत आहेत, काही तयार झाले आहेत यापुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
Edited By : Jagdish Pansare

