गळ्यात टोमॅटोची माळ, हातात रुमणे घेत माजी आमदार जाधव मैदानात..

भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदत मिळवून दिली तर आम्ही तालुका त्यांना दत्तक देण्यास तयार आहोत.
गळ्यात टोमॅटोची माळ, हातात रुमणे घेत माजी आमदार जाधव मैदानात..
ex mla harashvardhan jadhav active again politics news

कन्नड ः माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकरी व सर्वसामान्यांना तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, या मागणीसाठी मोर्चा काढला. टोमॅटोच्या पडलेल्या भावाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी गळ्यात माळ आणि हातात रुमणे व आसूड घेतला होता. (Former MLA Jadhav in the field holding a tomato necklace around his neck) हर्षवर्धन जाधव यांच्या या मोर्चाने तालुका दणाणून गेला असला तरी हे आंदोलन संजना जाधव यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले की काय? अशी चर्चा तालु्क्यात सुरू आहे.

दोन दिवसांपुर्वी संजना जाधव यांनी देखील याच मागणीसाठी तहसिलदारांना भेटून निवदेन दिले होते. (Ex Mla Harshvardhan Jadhav) त्यानंतर लगेच हर्षवर्धन यांनी काढलेला मोर्चा त्याला प्रत्युत्तर होते असे दिसते. हर्षवर्धन यांच्या मोर्चाला चांगली गर्दी जमली होती. एका अर्थाने या निमित्ताने त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपण अजून मैदान सोडलेले नाही हेच दाखवून दिले.

विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि कौटुंबिक वादामुळे हर्षवर्धन जाधव विचलित झाले होते, मात्र आता पुन्हा त्यांनी कन्नड या आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. (Morcha For Farmaer) अधून मधून ते आंदोलन करत असतात, मग ते टोलनाका असो की रस्त्याचे काम, पीक कर्ज, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज जोडणी अशा सगळ्याच प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपुत यांच्यावर टीका करतांनाच तुम्ही त्यांना निवडून देऊन कशी चूक केली हे देखील हर्षवर्धन अनेकवेळा आपल्या भाषण आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगत असतात. परंतु याकडे उदयसिंह राजपूत यांनी कधी लक्ष दिले नाही, की त्यांच्या टीकेला उत्तरही दिले नाही. कन्नड मतदारसंघात पुन्हा जम बसवून २०२४ मध्ये पुन्हा आमदार होण्याच्या दृष्टीने हर्षवर्धन जाधव कामाला लागले आहेत.

पण त्यांच्या पुढे विद्यमान आमदार राजपूत यांच्यासह संजना जाधव यांचे देखील मोठे आव्हान असणार आहे असे दिसते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आतापासूनच कन्नड मतदारसंघावर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. संजना जाधव यांना कन्नडमधून आमदार करतांना राज्यातील राजकीय विरोधक असलेल्या शिवसेना व हर्षवर्धन जाधव या दोघांनाही धोबीपछाड देण्याची रणनिती दानवे यांनी आखली आहे.

त्यामुळे संजना यांच्यासह स्वतः दानवे यांनी देखील कन्नड तालुक्यात संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा समारोप कन्नडमध्ये करण्यामागे दानवे यांचीच खेळी असल्याचे बोलले जाते. अशा कुरघोडीच्या राजकारणात हर्षवर्धन जाधव मागे कसे राहणार. चार दिवसांपुर्वी कन्नड तालु्क्यात अतिवृष्टी होऊन दोन पाझर तलाव फुटले, शेती, पीक, जमीनी वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन यांनी मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. कोरोना काळात आंदोलनावर बंदी असतांना या मोर्चासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी राज्य व केंद्र सरकारकडून तालुक्यातील जो पक्ष शेतकऱ्यांना सरसकट मदत निधी मिळवून देईल, त्या पक्षाला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पाठींबा देणार, अशी आश्चर्यकारक घोषणा केली. ही मदत न मिळाल्यास कुणालाही तालुक्यात मते मागू देणार नाही, असे आव्हान देखील दिले.

कन्नड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून मदत द्या, अशा मागणीसाठी हर्षववर्धन जाधव यांच्या नेतृत्वात कन्नड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता. भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदत मिळवून दिली तर आम्ही तालुका त्यांना दत्तक देण्यास तयार आहोत, असा टोला जनआशिर्वाद यात्रेचा संदर्भ देत त्यांनी लगावला. 

या आहेत मागण्या..

कन्नड- सोयगाव मतदार संघात गेल्या  पंधरा दिवसात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले असून भौगोलिक क्षेत्राचेही नुकसान झाले आहे.शासकीय परिपत्रक १३ मे २०१५ च्या तरतुदीनुसार उपाय योजना करण्यात याव्यात. सोयाबीन आयातीचा निर्णय मागे घ्यावा, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आली आहे.

 पुरामुळे,किंवा नदीपत्राची दिशा बदलल्यामुळे शेतजमीन वाहून गेल्यास हेक्टरी ३७५०० रुपयांची मदत मिळावी, असा शासन निर्णय आहे. त्याच प्रमाणे मृतास चार लाख,अपंगत्व आल्यास ५९१०० ते २ लाख, भांडीकुंडी यासाठी २०००रु,कपड्यांसाठी १८०० ,शेतजमिनीवर वाळूचा किंवा मातीचा किंवा गाळाचा ३ इंचापेक्षा जास्तीचा थर आला असल्यास हेक्टरी १२२०० रुपयांसह अनेक बाबींना शासन मदत करते.

प्रशासनाने या सर्व बाबींचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. केवळ पिकांचा पंचनामा करून केवळ शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत न करता प्रशासनाने शासन निर्णयाप्रमाणे सर्वांगीण व सरसकट मदत द्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 

Edited By : Jagdish pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in