लाॅकडाऊननंतर पहिला ठोक मोर्चा बीडमध्ये; मग राज्यभरात आंदोलन उभे करू - The first mass march after the lockdown in Beed; Then let's start a movement across the state | Politics Marathi News - Sarkarnama

लाॅकडाऊननंतर पहिला ठोक मोर्चा बीडमध्ये; मग राज्यभरात आंदोलन उभे करू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

मराठा समाजाचा इतिहास लढवय्या व संयमाचा आहे. तिन दशकांच्या लढाईनंतर मिळालेले आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाचा संयम ढळत असल्याचे विनायक मेटे म्हणाले.

बीड : मराठा समाज आता मूक नाही तर ठोक मोर्चा, आक्रोश मोर्चा काढणार असून लॉकडाऊन संपल्यानंतर बीडमध्ये पहिला मोर्चा निघेल, अशी माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे ( Mla Vinayk Mete Warn State Government)  यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. पाच) मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर गुरुवारी (ता. सहा) बीडमध्ये विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ( Mete says protest After Lockdwon for Maratha Reservation) आरक्षण रद्द झाल्यानंतर आक्रमक प्रतिक्रीया येत आहेत. त्यामुळे यापुढे निघणारे मोर्चेही आक्रमक असतील असे मेटे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी (ता. सात) पाच व्यक्ती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देतील. मुख्यमंत्र्यांनी समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण देता येईल त्या पद्धतीने तत्काळ द्यावे. अन्यथा मराठा समाज राज्यभरात रस्त्यावर उतरेल.

आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास खूप व्यापक आणि लढवय्या राहिलेला आहे. संयमाने लढणारे त्यांच्याच वंशाजांचा संयम या निर्णयाने सुटताना दिसत आहे. आरक्षणाची लढाई देखील तीन दशकांहून मोठी आहे. जगाच लक्ष वेधणारे ५८ मूकमोर्चे आणि तरुणांच बलीदानही धुळीस मिळाले. येत्या काळात राज्यभरात मोठा उद्रेक होण्याची शक्यताही  मेटे यांनी वर्तविली.

वेळकाढूपणा करू नका

दरम्यान, आरक्षण रद्द होण्याने समाजासमोर अंधार निर्माण झाला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष आपण सुरूच ठेवणार आणि सर्व महाराष्ट्रभर आंदोलने उभी करणार. बीडमधील मोर्चानंतर राज्यभर जनजागृती करत मोर्चे काढणार आहोत. ( CM Uddhav Thackeray is Only Timepass)  मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडे बोट दाखवून वेळ काढूपानाचे काम करू नये.

आपण स्वतः आणि महाराष्ट्र सरकार काय करणार आहोत हेच जाहीरपणे सांगावे. उगाच हात जोडण्याचे नाटक करू नये आणि निष्क्रिय अशोक चव्हाणांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली.

ही बातमी पण वाचा ः काम जमत नसेल तर सरकारकडे परत जा, भाजप नगरसेवकाने आयुक्तांना सुनावले

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख