कोरोना विरुद्धची लढाई निकराची, पंधरा दिवस महत्वाचे : मुंडेंचा सावधानतेचा इशारा..

बीड जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबतीतआत्मनिर्भर बनवू, जिल्ह्यात कुठेही एक लिटर ऑक्सिजन देखील कमी पडणार नाही.
Dhnanjay Munde Corona Reviewe Meeting News Beed
Dhnanjay Munde Corona Reviewe Meeting News Beed

बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे व निर्वानीचे आहेत. जिल्ह्यात कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडीसीविर किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकरांशी बोलतांना मुंडे यांनी सविस्तर माहिती दिली.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, मृत्युदर देखील वाढला असुन, योग्य उपचार, बेडची उपलब्धता यासह ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शनची वेळेवर व रास्त भावात उपलब्धी या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

बीड जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवू, जिल्ह्यात कुठेही एक लिटर ऑक्सिजन देखील कमी पडणार नाही, अशी ग्वाही देतांना धनंजय मुंडे म्हणाले, रेमडीसीविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, साठेबाजी व काळाबाजार करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत, याबाबत प्रभावी यंत्रणा राबवून दैनंदिन तत्वावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाच इंजेक्शन व ते ही रुग्णालयामार्फत देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात आलेले प्रत्येक इंजेक्शन व त्याच्या वाटपाचे दररोज ऑडिट करण्याचे आदेश देखील आपण संबंधित यंत्रणेला दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. रुग्णांच्या व्यवस्थापणापासून ते इतर सर्वच बाबींमध्ये प्रशासकीय व्यक्तीकडून हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यास त्यावर कारवाई केली जाईल,  असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसात ऑक्सिजन बेड वाढवणार

जिल्हा प्रशासनाकडे २५०० ऑक्सिजन बेड तयार आहेत. लोखंडी सावरगाव कोविड सेंटर येथील बेड संख्या मागील काही दिवसात रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने कमी करण्यात आली होती.  मात्र आताची रुग्णसंख्या पाहून, ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडसची संख्या तातडीने वाढविण्यात येणार आहे.  बेडची संख्या कमी पडत असेल तर जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन तिथे उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे मुंडे यांनी सांगितले.

तालुका स्तरावर मंगल कार्यालये किंवा तत्सम आस्थापना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन तिथे विलगिकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असल्याने, अंबाजोगाई  येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव प्रयोगशाळेवर याचा ताण वाढला आहे.  चाचण्यांचे अहवाल यायला वेळ लागतो आहे.

यामुळे बीड येथील जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे नव्याने पाठवून तो तातडीने मंजूर करून घेतला जाईल.  येत्या काही दिवसातच त्यासाठीची सामग्री उपलब्ध करून बीड जिल्हा रुग्णालयात प्रतिदिन १२०० चाचण्या केल्या जातील अशी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येईल.

हात जोडतो, नियम पाळा..

मागील वर्षी बीड जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला प्रत्येक निर्णयात सहकार्य केले, त्यामुळे जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नगण्य होती, मात्र गेल्या तीन महिन्यात ही  भरमसाट वाढली आहे. मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

संपूर्ण बीड जिल्हा हेच माझे कुटुंब आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या जीवांचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. मी मंत्री म्हणून नाही तर, कुटुंबातील सदस्य म्हणून हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा,  असे कळकळीचे आवाहन देखील मुंडे यांनी यावेळी केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com