जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी राज्यमंत्री सत्तारांची फिल्डींग; मुलासह अर्ज दाखल - Fielding of Minister of State for Power to take possession of District Bank | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी राज्यमंत्री सत्तारांची फिल्डींग; मुलासह अर्ज दाखल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद सर्वाधिक काळ काॅंग्रेसकडे राहिले आहे. आता या बॅंकेत आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरू केले आहेत.

औरंगाबाद ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील जिल्हा बॅंका डबघाईस आल्या तेव्हा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंक तत्कालीन अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही बॅंक केवळ सेक्शन अकरा मधून बाहेरच नाही काढली, तर नफ्यात देखील आणली. सर्वपक्षीय संचालक मंडळ असलेल्या जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद सर्वाधिक काळ काॅंग्रेसकडे राहिले आहे. आता या बॅंकेत आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरू केले आहेत. स्वतःसह मुलाला देखील त्यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत उतरवले आहे.

जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांचा जिल्हा बॅंकेशी अत्यंत जवळून संबंध असतो. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून मतदरासंघातील सभासदांना कर्ज, विविध योजनांचा सर्वाधिक लाभ मिळवून त्या जोरावर विधानसभा,जिल्हा परिषद निवडणुकीत मते मिळवली जातात. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक राज्यात चर्चेत असलेली बॅंक आहे. येथील नोकर भरती घोटाळा, तत्कालीन अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे बॅंकेच्या कारभाराची चर्चा सर्वदुर पसरली होती. संचालक मंडळातील सदस्यांच्या सोसायट्यांना कोट्यावधींचे कर्ज माफ केल्याचे प्रकरण देखील राज्यभरात गाजले होते.

दरम्यान, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी गेल्या वर्षी आत्महत्या केल्यामुळे या बॅंकेतील कारभारावर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. कोरोनामुळे वर्षभर लांबलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झाला आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या चारही प्रमुख पक्षांचे संचालक या बॅंकेच्या संचालक मंडळावर आहेत. माजी अध्यक्ष दिवंगत सुरेश पाटील यांनी तोट्यात गेलेली जिल्हा बॅंक नफ्यात आणण्याची किमया साधली होती. यासाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेत बॅंकेच्या अनावश्यक खर्चांवर मर्यादा आणल्या होत्या.

सेक्शन अकरामधून ही बॅंक बाहेर काढून नफ्यात आणण्यात देखील अध्यक्ष म्हणून त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव माजी आमदार नितीन पाटील यांची सर्वानुमते अध्यपदी निवड करण्यात आली होती. आता जिल्हा बॅंकेवर ताबा मिळवण्यासाठी शिवसेनेचे मंत्री व जिल्हा बॅंकेचे माजी संचालक अब्दुल सत्तार यांची कंबर कसली आहे. जिल्हा बॅंकेत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी आपला मुलगा समीर याला देखील मैदानात उतरवले आहे.

जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मागील संचालक मंडळाने दोन बैठका घेऊन प्रयत्न केले असले तरी यात त्यांना यश आलेले नाही. राज्याचे रोहयो मत्री संदीपान भुमरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार या पुढारी मंडळीचा बॅंकेच्या संचालक मंडळात समावेश आहे. सुरेश पाटील यांच्या मृत्यूनंतर पुढील काही कालावधीसाठी संचालक मंडळाने नितीन पाटील यांना अध्यक्ष केले. पण आता मात्र अध्यक्षपदावरून देखील निवडूण येणाऱ्या नव्या संचालक मंडळात रस्सीखेच असणार आहे असे दिसते.

सत्तार-पाटील साथ साथ

जिल्हा बॅंकेच्या राजकारणात अब्दुल सत्तार यांचे आणि तत्कालीन अध्यक्ष व काॅंग्रसचे नेते सुरेश पाटील यांच्यात चांगले संबंध होते. सत्तार यांनी या जवळीकीचा फायदा विधासभा निवडणुकीत वेळोवेळी करून घेतला. पाटील यांच्या पश्चात सत्तार यांनी त्यांचे चिरंजवी व जिल्हा बॅंकेचे विद्यमना अध्यक्ष नितीन पाटील यांच्यांशी देखील जुळवून घेतले.

विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करतांना देखील सत्तार आणि नितीन पाटील सोबत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजकीय खेळी यशस्वी करण्यात सत्तार यांचा हातखंडा आहे. जिल्हा बॅंकेची सुत्र आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हातात राहावी, असे प्रयत्न सत्तार यांच्याकडून सुरू असल्याचे दिसते.

बिनविरोध निवडणुकीसाठीच्या बैठकांना देखील सत्तार यांनी दांडी मारल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा बॅंकेची निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार यांची भूमिका महत्वाची ठरणार हे मात्र निश्चित. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी २१ मार्चला मतदान होणार असून २२ मार्चला मतमोजणी होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख