ताई टेस्ट निगेटीव्ह आली असली, तरी काळजी घ्या.. - Even if the sister test is negative, be careful | Politics Marathi News - Sarkarnama

ताई टेस्ट निगेटीव्ह आली असली, तरी काळजी घ्या..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 एप्रिल 2021

राजकारणा एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी हे तीघे सोडत नसले तरी कौटुंबिक नाते मात्र ते सांभाळतांना दिसत आहेत.

औरंगाबाद ः बीडच्या भाजप खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी नुकतीच सोशल मिडियावर आपली तब्यत बरोबर नसल्याचे सांगितले होते. या सोबत आपली कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या सोशल मडियावरील संदेशानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीला एक भावनिक सल्ला दिला आहे. ताई टेस्ट निगेटीव्ह आली असली तरी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घेण्यास सांगितले आहे.

या संदर्भात धनंजय मुंडे यांनी केलेल्या एक ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. बीड आणि राज्याच्या राजकारणात बहिण-भाऊ असलेल्या धनंजय, पंकजा व प्रीतम मुंडे यांच्यातील कौटुंबिक संबंध अजूनही जिव्हाळ्याचे आणि एकमेकांची काळजी घेणार असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा मुंडे भगिनींनी आपल्या भावाबद्दल काळजी व्यक्त करत सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे जेव्हा आजारी होत्या तेव्हा देखील राजकीय मतभेद बाजूला सारत धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीची काळजी घेत त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बीड जिल्ह्यात देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शन, आॅक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

यावरून काही दिवसांपुर्वी पंकजा, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या सोशल मिडियावर वाॅर देखील रंगला होता. नुकत्याच झालेल्या बीड जिल्हा बॅंकेतील राजकारण देखील राज्यात चर्चिले गेले. राजकारणा एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी हे तीघे सोडत नसले तरी कौटुंबिक नाते मात्र ते सांभाळतांना दिसत आहेत.

खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्या आजारपणाची माहिती कळताच धनंजय मुंडे यांनी ट्विट करत त्यांना भाऊ म्हणून वडिलकीचा सल्ला देखील दिला. टेस्ट निगेटीव्ह आली असली तरी डाॅक्टरांचा योग्य सला घेऊन उपचार व काळजी घ्या, या त्यांच्या सल्ल्याने धनंजय मुंडे यांच्यातील हळव्या भावाचे दर्शन देखील या निमित्ताने घडल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख