औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या जागेची परस्पर विक्री करून शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी उद्या (ता.२६) पासून आमरण उपोषणावर बसण्या्ची घोषणा केली होती. विशेष म्हणजे इम्तियाज जलील हे स्वःत कोरोनाग्रस्त आहेत. तरी देखील उपोषणावर आपण ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उपाचार संपताच आपण उपोषणावर बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तसेच खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण झाल्याने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या सामुहिक आमरण उपोषणास परवानगी नाकारण्यात आली आहे. तुर्तास परवनागी नाकारण्यात आली असली तरी कोरोनाचे उपचार संपताच वक्फ बोर्डच्या जागेचा महाघोटाळा करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी याकरिता आमरण उपोषण करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील जालना रोडवरील तब्बल एक लाख स्केवेअर फूट वक्फ बोर्डाच्या जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करुन बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याची खळबळजनक माहिती इम्तियाज जलील यांनी पत्रकरा परिषद घेऊन जाहीर केली होती. या गैरव्यवहारात १०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता.
या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे, अन्यथा मी स्वत: जिल्ह्याचा खासदार या नात्याने दिनांक २६ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहिक आमरण उपोषण करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहिल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, इम्तियाज जलील यांची राज्य सरकारकडून महाराष्ट्र वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांच्या आरोप व मागणीवर कुठल्याही प्रकारची कारवाई आजतागायत करण्यात आलेली नाही. इम्तियाज जलील यांनी दिलेली डेडलाईन उद्या संपत असल्यामुळे ते समर्थकांसह उपोषणाला बसणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु कोरोनाचे वाढते रुग्ण आणि राज्य सरकारने कुठल्याही जाहीर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंदी पाहता इम्तियाज जलील यांच्या नियोजित उपोषणाला देखील परवानगी नाकारण्यात आली आहे.
खासदारही कोरोना पाॅझीटीव्ह..
एकीकडे उपोषणाला परवानगी नाही, तर दुसरीकडे स्वःत इम्तियाज जलील हे देखील कोरोनाग्रस्त आहेत. गुजरात राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची मोठी जबाबदारी जलील यांच्यावर होती. दरम्यान त्यांना कोरोनाची लागन झाल्याचे निदान नुकतेच झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना तुर्तास उपोषण करता येणार नाही.
असे असले तरी वक्फ बोर्डाची जागा हडपणाऱ्यांनी खुश होऊ नये, सर्व घोटाळेबाजांना तुरुंगात पाठविल्याशिवाय मी शांत बसणार नाही. उपचार संपताच मी पुन्हा नव्या जोमाने धन्नासेठांवर कायदेशिर कारवाई व्हावी या करिता आमरण उपोषण करणारच असे इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
Edited By : Jagdish Pansare

