बदनामी करू नका, कुटुंबासह आत्महत्या करीन;पुजा चव्हाणच्या वडिलांचा इशारा..

माझ्या समोर दोनच पर्याय शिल्लक असल्याचे सांगत एक तर कोर्टासमोर जाऊन कुटुंबासह आत्महत्या करीन, किंवा मग बदनामी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत धाव घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करेन, असा इशारा दिला आहे.
Pooja Chavan Family Angry News Aurangabad
Pooja Chavan Family Angry News Aurangabad

औरंगाबाद ः माझ्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण सुरू आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे, पण रोज कुठला तरी फोटो, व्हिडिओ क्लीप दाखवून माझ्या मुलीची आणि आमच्या कुटुंबियांची बदनामी सुरू आहे. हे सगळे प्रकार थांबले पाहिजे, नाहीतर कुटुंबासह कोर्टासमोर जाऊन आत्महत्या करण्याशिवाय माझ्या समोर पर्याय राहणार नाही. बदनामीचे प्रकार थांबले नाही तर मला ती करणाऱ्यांच्या विरोधात मला पोलिसांत गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा मृत पुजा चव्हाणच्या वडिलांनी दिला आहे.

मुळची परळीची असलेली टिकटाॅक स्टार पुजा चव्हाण हिने नुकतीच पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणावरून राज्यात वादंग निर्माण झाले असून राज्य सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी नाव जोडले जात आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनमंत्री संजय राठाेड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये पुजा चव्हाण हिच्या आत्महत्या व वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील विविध फोटो, व्हिडिओ क्लीप व बातम्या प्रसारित होत आहेत. पुजा चव्हाणच्या कुटुंबियांनी या संदर्भात यापुर्वीच आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे. मात्र रोज येणाऱ्या बातम्या, दाखवण्यात येणारे फोटो, व्हिडिओ यामुळे उद्विग्न झालेल्या चव्हाण कुटुंबियांनी आज थेट आत्महत्येचाच इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

पुजा चव्हाणचे वडील, आई आणि बहिणीने एका वृत्तवाहिनीशी बोलतांना संतप्त प्रतिक्रिया देत आमची बदनामी थांबवा असे आवाहन केले आहे. पुजाच्या वडिलांनी तर आमच्या कुटुंबियांच्या बदनामीचे प्रकार थांबले नाही, माझ्या समोर दोनच पर्याय शिल्लक असल्याचे सांगत एक तर कोर्टासमोर जाऊन कुटुंबासह आत्महत्या करीन, किंवा मग बदनामी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत धाव घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करेन, असा इशारा दिला आहे.

कायदेशीर व्हायचे ते होईल, बदनामी कशाला..

पुजा चव्हाण हिचा आईने देखील प्रसार माध्यमांमधून मुलीची व कुटुंबाची होत असलेली बदनामी क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे. माझी मुलगी गेली याचे दुःख आणि डोक्यात अजूनही तेच विचार आहेत. तिला न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. कायद्याने जे व्हायचे ते होईल, पण मग बदनामी का केली जात आहे? ती थांबवा, असे आवाहन करतांना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला होता.

तर पुजाच्या बहिणीने माझी बहीण अकरावीत असतांना पासून राजकारणात होती. तीचे पंकजा मुंडे, डाॅ. प्रितम मुंडे यांच्यासह राजकीय कार्यकर्त्यांसोबत अनेक फोटो आहेत. पण त्यापैकी एकही फोटो प्रसार माध्यमांमध्ये दाखवला जात नाही? कारण ते फोटो पुरुषांसोबत नाही तर महिलांसोबत आहेत. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून याने आमच्या कुटुंबियांची बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com