पुन्हा पुन्हा तेच सांगायला लावू नका, विभागीय आयुक्त केंद्रकर वैतागले.. - Don't make me say the same thing over and over again, Divisional Commissioner Kendrakar | Politics Marathi News - Sarkarnama

पुन्हा पुन्हा तेच सांगायला लावू नका, विभागीय आयुक्त केंद्रकर वैतागले..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

विभागीय आयुक्त केंद्रकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य, पोलीस व प्रशासन विभागाला धारेवर धरले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंग मध्ये झालेल्या या संवादाचा आॅडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायला पाहिजे, तयारी कशी असली पाहिजे, या गोष्टी वर्षभरापुर्वी सांगून झाल्या आहेत. त्याच त्या गोष्टी पुन्हा सांगायाला लावू नका, अशा शब्दात विभागीय आयुक्त केंद्रकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य, पोलीस व प्रशासन विभागाला धारेवर धरले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंग मध्ये झालेल्या या संवादाचा आॅडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राज्यात व देशात कोरोनाचे रुग्ण नव्याने वाढतायेत. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची व्हिडिओ काॅन्फरन्स घेऊन येणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला कसा करायचा या संदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची व्हिसी घेतली.

यावेळी त्यांनी परभणी, हिंगोली, बीड, नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी, काॅन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परभणीचा उल्लेख करतांना कलेक्टरांना दहा वेळा सांगून झाले पण, काहीच होत नाही, त्यांचा काय प्राॅब्लेम आहे माहित नाही, तुमचे ट्रेसिंग टेस्टिंगचे प्रमाण फक्त ९ आहे ते कुठल्याही जिल्ह्याचे २० पेक्षा कमी येता कामा नये, अशी सक्त ताकीद केंद्रकर यांनी दिली.

परभणी प्रमाणेच हिंगोली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सुविधांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कालच्या व्हिसीत कौतुक झाले असले तरी कोरोनाच्या बाबतीत हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही, असा इशारा केंद्रकर यांनी यावेळी दिला. मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेसची तपासणी करून तिथे कोरोना बाबतीतचे नियम पाळले जात नसतील तर त्यांना नोटीस द्या, दंडात्मक कारवाई करा, गुन्हे दाखल करा, असे आदेश केंद्रेकरांनी दिले.

कोरोनाच्या नव्या स्टेंटची शक्यता लक्षात घेऊन संपुर्ण यंत्रणेचा आढावा घ्या, कोरोना सेंटरचा आढावा घेऊन तेथील यंत्रणा, औषधी, उपकरणांचा आढावा घेऊन ती तातडीने सज्ज ठेवा. खाजगी रुग्णालयांमध्ये किंवा डाॅक्टरकडे जाऊन उपचार घेणाऱ्यांवर बारकाईन लक्ष ठेवून कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांना तातडीने आयसोलेट करून त्यांच्या चाचण्या करा.

कुठल्याही परिस्थितीत कोरोना झालेली व्यक्ती बाहेर बोबंलत फिरता कामा नये, पुर्वी प्रमाणे ज्या भागात रुग्ण आढळेल तो भाग किंवा किमान ती बिल्डिंग तरी सील केली पाहिजे, अशा स्पष्ट सूचना केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मास्क न वापरणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड करा, असेही ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख