इथं रुग्णांचे जीव जात असतांना इतर जिल्ह्यांना व्हेंटिलेटर देण्याचा दिलदारपणा दाखवू नका.. - Do not show kindness to give ventilators to other districts while patients are dying here. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

इथं रुग्णांचे जीव जात असतांना इतर जिल्ह्यांना व्हेंटिलेटर देण्याचा दिलदारपणा दाखवू नका..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

इतर जिल्ह्यात जर व्हेंटिलेटर नसतील तर तो त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मंत्री व नेत्यांचा प्रश्न आहे, ते तो सोडवतील.

औरंगाबाद ः इथं आपल्या जिल्ह्यात व्हेंटिलेटर नाही म्हणून रुग्ण मरतायेत, आणि तुम्ही आम्ही काय करतो हे दाखवण्यासाठी औरंगाबादचे व्हेंटिलेटर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना पाठवण्याचा दिलदारपणा दाखवू नका, अशा शब्दांत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सुनावले. जिल्हाधिकारी कार्यालया आज झालेल्या बैठकीत सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी इतर जिल्ह्यांना व्हेंटिलेटर पाठवण्यास विरोध दर्शवला.

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जातो. आजच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शिवाय जिल्ह्यात पुरेसा आॅक्सीजन साठा असल्याचेही स्पष्ट केले. पण याचवेळी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी व्हेंटिलेटरचा मुद्दा उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

औरंगाबादच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. व्हेंटिलेटरची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. आपल्याकडे व्हेंटिलेटर खूप आहेत, असे सांगितले जाते, एवढेच नाही तर ते मराठवाडा व शेजारच्या नगर जिल्ह्यात देखील पाठवण्यात येत आहेत.

मुळात वस्तुस्थिती अशी आहे की, आजही अनेक रुग्णांचे व्हेंटिलेटर मिळाले नाही म्हणून जीव जात आहेत. मग आपल्याकडेच ही अवस्था आहे, तर मग इतर जिल्ह्यात व्हेंटिलेटर पाठवून देण्याचा निर्णय परस्पर का घेतला जातो? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.

विभागीय आयुक्त असोत, की जिल्हाधिकारी आपण खूप काही करतोय असे दाखवण्यासाठी जर असे प्रकार केले जात असतील तर कृपया ते करू नका. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे. शहरात व्हेंटिलेटर जास्त असतील तर ते आधी ग्रामीण भागात गरजेनूसार द्या.

ती गरज पुर्ण करून जर उरत असतील तर निश्चित बाहेर द्या, पण आपल्याकडेच नाही आणि आपण इतर जिल्ह्यांना व्हेंटिलेटर देण्याचा दिलदारपणा दाखवत असला तर तो चुकाचा आहे, असेही शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांच्या मुद्द्याला आमदार अंबादास दानवे, अतुल सावे यांनी देखील दुजोरा दिला. खासदार इम्तियाज जलील यांनी देखील शिरसाट यांचा व्हेंटिलेटरचा मुद्दा योग्य असल्याचे सांगत, इतर जिल्ह्यात जर व्हेंटिलेटर नसतील तर तो त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मंत्री व नेत्यांचा प्रश्न आहे, ते तो सोडवतील. तुम्ही आधी आपल्या जिल्ह्याची गरज पुर्ण करा, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख