बाबरी मशिदीचा मुद्दा काढून आमच्या जखमा ताज्या करू नका - Do not refresh our wounds by removing the issue of Babri Masjid | Politics Marathi News - Sarkarnama

बाबरी मशिदीचा मुद्दा काढून आमच्या जखमा ताज्या करू नका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मार्च 2021

राजकीय विषय सभागृहात बोलणे हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे. हे सरकार एकट्या शिवसेनेचे नाही.

मुंबईः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, ते एकट्या शिवसेनेचे नाह. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात राजकीय भाषण करणे योग्य नव्हते. हे सरकार धर्मनिरपेक्ष आहे, मग राम मंदिर, बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा उकरून का काढला जातोय? असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला. आमच्या जखमा पुन्हा ताज्या करू नका, असा इशारा देखील त्यांनी सभागृहात दिला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर काल सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी आपली भूमिका सभागृहात मांडली. या प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तास भाषण करत भाजपवर हल्ला चढवला होता. हिंदुत्व, राम मंदिर, बाबरी मशीद कुणी पाडली असे अनेक वादग्रस्त विषय त्यांच्या भाषणात आले. विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांचे भाषण हे राजकीय चौकातल्या सभे सारखे होते अशी टीका देखील केली.

आज पुरवणी मागण्यावर सभागृहात चर्चा सुरू असतांना मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणाचे पडसाद उमटले. सुरुवातीला भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मालाड आणि मालवणीमधून हिंदूना कसे हुसकावूण लावले जात आहे, असा मुद्दा उपस्थित केला. त्याला मंत्री असलम शेख यांनी आक्षेप घेत भाजपचा मुंबईतील तुमचा एक अध्यक्षच बांगलादेशी असल्याचा आरोप केला.

समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबु आझमी यांनी जेव्हा पुरवणी मागण्यावर बोलायाला सुरूवात केली, तेव्हा त्यांनी मुंबई व मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडले. पण भाषणाचा शेवट करतांना त्यांनी मुख्य्मंत्र्यांच्या कालच्या भाषणावर नाराजी व्यक्त केलीअबु आझमी म्हणाले, बाबरी मशीद पाडण्यात आली तो एक गुन्हा होता हे सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात नमूद केलेले आहे. हा विषय आता संपलेला असतांना राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत त्यावर सभागृहात बोलण्याची काहीच गरज नव्हती.

राजकीय विषय सभागृहात बोलणे हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे. हे सरकार एकट्या शिवसेनेचे नाही, राष्ट्रवादी, काॅंग्रेसचा देखील सरकारमध्ये तेवढाच सहभाग आहेसमान किमान कार्यक्रमावर काम करण्याच्या अटीवर हे सरकार सत्तेवर आलेले आहे. सरकारची वाटचाल देखील त्याच दिशेने सुरु असतांना राम मंदिर, बाबरी मशीद यासारखे विषय सभागृहात कशासाठी उपस्थित केले जातात.

बाबरी मशीद आम्ही पाडली, शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे हे मुख्यमंत्र्यांचे विधान मनाला वेदना देणारे आहे. बाबरी मशीदीच्या जखमा अजूनही आमच्या मनात घर करून आहेत, कृपया त्या पुन्हा उकरू नका, असे आवाहन देखील अबू आझमी यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी काही आमदारांनी आरडाओरड सुरू केली तेव्हा, चिल्लाव मत, चिल्लाना मुझे भी आता है, म्हणत अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख