जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काॅंग्रेस एकाकी, तर भाजपने जुळवून घेतले

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत पाच विद्यमान आमदार मैदानात उतरले आहेत.पैकी सत्तार भुमरे, बागडे हे आधीपासूनच जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत होते
Aurangabad District Bank Election News
Aurangabad District Bank Election News

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या १८ संचालकांसाठी रविवारी (ता.) मतदान होत आहे. यासाठी ४८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गेली अनेक वर्ष जिल्हा बॅंकेवर काॅग्रेसचे वर्चस्व होते. संचालक मंडळात जरी सर्वपक्षांचे प्रतिनिधी असले तरी बॅंकेच्या तिजोरीच्या चाव्या काॅंग्रेसच्याच हाती असायच्या. पण आज हीच काॅंग्रेस जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत एकाकी पडल्याचे चित्र आहे.

माजी अध्यक्ष दिवंगत सुरेश पाटील यांनी सर्वाधिक काळ बॅंकेचे अध्यक्षपद भुषवले, पण त्यांच्या दुर्दैवी मृत्यनंतर त्यांचे चिरंजीव व बॅंकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील हेच भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. आता राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात असलेल्या भाजपने स्थानिक पातळीवर शिवसेना-राष्ट्रवादीशी जुळवून घेतले. तर काॅंग्रेस एकाकी पडली आहे.

जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरूवातीला प्रयत्न झाले, पण ते फोल ठरले. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे गेल्या अनेक वर्षापासून बॅंकेच्या संचालक मंडळावर आहेत. याचा राजकीय फायदा देखील त्यांनी निवडणुकीत उचलला आहे.

आता बॅंकेचा कारभार आपल्याला अनुकूल अशाच व्यक्तीच्या हातात राहावा आणि जास्तीत जास्त संचालक हे आपल्या विचारांचे निवडूण यावे, असा प्रयत्न सत्तार, भुमरे यांनी केला. बिनविरोध निवडीसाठीच्या अटी-शर्थी मान्य न झाल्यामुळे थेट भाजपसोबत बॅंकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेच्या या दोन नेत्यांनी कंबर कसली. यावेळी सोबतीला त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी देखील घेतले.

समतोल साधण्यासाठी राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना देखील या निमित्ताने सहकार क्षेत्रात एन्ट्रींची संधी मिळाली. भाजपसोबत पॅनल तयार केल्यामुळे शिवसेनेत दोन गट असल्याचे यावेळी दिसून आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भुमरे, सत्तार, दानवे यांच्यावर वरिष्ठ नेत्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला आहे.

खैरे मदतीला धावले पण

विशेष म्हणजे काॅंग्रेसने जिल्हा बॅंक निवडणूकीत उतरवलेल्या शेतकरी सहकार विकास पॅनलच्या व्यासपीठावरून खैरे यांनी हे आरोप केले. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डाॅ. कल्याण काळे, माजी आमदार सुभाष झांबड यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या पॅनलला ऐनवेळी धक्का बसला तो काळे यांना कोरोनाने गाठल्यामुळे.

मतदानाची तारीख जवळ आलेली असतांनाच काॅंग्रेसच्या प्रचाराची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती ते कल्याण काळेच आजारी पडल्यामुळे शेतकरी विकास सहकार पॅनल अडचणीत आले. एकाकी पडलेल्या काॅंग्रेसच्या मदतीला चंद्रकांत खैरे धावून आले असले तरी आता त्याला खूप उशीर झाला असेच म्हणावे लागेल. तर दुसरीकडे रविवारी नियोजन पद्धतीने मतदान करवून घेण्यासाठी सत्तार, भुमरे, दानवे, बागडे यांनी रणनिती आखली आहे.

पाच विद्यमान आमदार मैदानात

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत पाच विद्यमान आमदार मैदानात उतरले आहेत. पैकी सत्तार, भुमरे, बागडे हे आधीपासूनच जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत होते. तर अंबादास दानवे, सतिश चव्हाण हे पहिल्यांदाच सहकार क्षेत्रातील निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. दोन्ही पॅनलचे प्रत्येकी एक उमेदवार याआधीच बिनविरोध निवडूण आले आहेत.

यात रोहयो मंत्री संदीपान भुमरे पैठण, तर किरण पाटील डोणगांवकर खुल्ताबाद यांचा समावेश आहे. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व प्रामुख्याने भुमरे, सत्तार, बागडे यांच्याकडे आहे. शेतकरी विकास पॅनलची घोषणा जेव्हा करण्यात आली त्यावेळी बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हेच असतील असे बागडे, सत्तार यांनी जाहिर केले होते.

बॅंकेचे माजी अध्यक्ष दिवंगत सुरेश पाटील यांनी संकटात सापडलेली जिल्हा बॅंक नफ्यात आणली, त्यामुळे त्यांच्या पश्चात बॅंकेचा कारभार त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्याकडेच राहावा, अशी बहुतांश मतदारांची इच्छा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांचे यावर एकमत असल्याचे बोलले जाते.

मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले असतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काॅंग्रेसच्या बाजूने या निवडणुकीत उडी घेतली आहे. याचा कितपत फायदा काॅंग्रेसला होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com