आमदार क्षीरसागरांची साथ सोडणाऱ्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका - Disqualification petition against corporator who left MLA Kshirsagar | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार क्षीरसागरांची साथ सोडणाऱ्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका

दत्ता देशमुख
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

मागच्या नगर पालिका निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान देत काकू - नाना आघाडीच्या माध्यमातून पालिकेची निवडणुक लढविली होती. त्यात अपेक्षित यशही मिळाले होते.

बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील काकू - नाना विकास आघाडीतून विजयी झालेल्या आणि नुकतीच त्यांची साथ सोडलेल्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

नगरसेवक प्रभाकर जगन्नाथ पोपळे, रंजीत देविदास बनसोडे, सिता भैय्यासाहेब मोरे, कांताबाई बन्सीधर तांदळे व अश्विनी धर्मराज गुंजाळ यांच्या विरोधात दाखल याचिकेवर येत्या मंगळवारी २३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तशा नोटीसा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांना बजावल्या आहेत. 

संदीप क्षीरसागर यांनी मागच्या नगर पालिका निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर या दोन्ही काकांविरोधात शड्डू ठोकत आव्हान दिले. त्यावेळी राष्ट्रवादीत असल्याने पक्षाचे चिन्ह व उमेदवारींचे अधिकार जयदत्त क्षीरसागर यांना भेटले. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी काकू - नाना आघाडीची स्थापना करुन पालिका रणांगणात उडी घेतली.

राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. भारतभूषण क्षीरसागर तर त्यांच्या विरोधात मोठे बंधू आणि संदीप क्षीरसागर यांचे वडिल रविंद्र क्षीरसागर आघाडीकडून रिंगणात होते. यात डॉ. क्षीरसागर विजयी झाले. पण, संदीप क्षीरसागर यांचे नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी झाले. त्यावेळी यश मिळविलेल्या एमआयएमच्या एका गटाला गळाला लावत सर्व सभापतीपदे आणि उपनगराध्यक्षपदांवर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली.

पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही संदीप क्षीरसागर यशस्वी ठरले. दरम्यान, याच काळात जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जयदत्त क्षीरसागर यांना मागच्या युती सरकारमध्ये सहा महिन्यांसाठी कॅबीनेट मंत्रीपदही मिळाले. त्यांच्या प्रवेशामुळे बीड मतदार संघातील राष्ट्रवादीची सर्व सुत्रे संदीप क्षीरसागर यांच्या हाती आली.

दरम्यान, त्यांनी विधानसभा निवडणुकीतही काकांना चित केले. मात्र, अलिकडच्या काळात काही नगरसेवकांनी आघाडी सोडून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर कायद्याखाली या नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख