शासन झोपले काय? जळगाव जिल्ह्यात `रेमडेसिविर`चा तुटवडा : गिरीश महाजन - Did the regime sleep? Shortage of 'Remedisivir' in Jalgaon district: Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

शासन झोपले काय? जळगाव जिल्ह्यात `रेमडेसिविर`चा तुटवडा : गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना शासनाने मरणावर सोडले आहे का? असा सवाल माजीमंत्री भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी म्हटले आहे, की जळगाव जिल्ह्यात तसेच जवळच्या बुलढाणा, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर या इंजे्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. जास्त रक्कम देऊनही ते उपलब्ध होत नाही.

जिल्ह्यात पाचोरा, चोपडा, येथे ठिकाणची स्थित अतिशय गंभीर झाली आहे. इंजेक्शन अभावी रूग्ण दगवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासन मात्र कोणतीही उपाययोजना करीत असल्याचे दिसत नाही.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, इंजे्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मग ते रुग्णांना का मिळत नाही. त्याचा काळाबाजार होत आहे का, याचा तपास शासनाने करावा, तसेच झोपेतून जागे होवून इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा रुग्णांना करून त्यांचे जीव वाचवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

हेही वाचा...

आदेश डावलून जेऊरमध्ये बाजार 

नगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडे बाजार भरविण्यावर बंदी घातली असतानाही जेऊरमध्ये (ता. नगर) आठवडे बाजार आज (शनिवारी) भरला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्न व अंत्यविधीला उपस्थितीची अट घातली असून, त्याबरोबरच आठवडे बाजार भरविण्याला प्रतिबंध केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र, जेऊर (ता. नगर) येथे आज (शनिवारी) आठवडे बाजार भरला. त्यात भाजीपाल्यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. 

विशेष म्हणजे, नगर तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, जेऊरसह परिसरात सुमारे पाचशे जण मागील आठवड्यात बाधित आढळून आले. दरम्यान, जेऊर गाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असून, येथे पोलिस चौकी आहे. तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र, आज चौकीतील एकाही कर्मचाऱ्याने बाजाराबाबत कारवाई केली नाही. 

जेऊर (ता. नगर) येथे आठवडे बाजार भरूनही, तहसील प्रशासनाला याबाबत कुठलीही माहिती नव्हती. तहसील कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तेव्हा, "आठवडे बाजार भरल्याबाबत आम्हाला माहिती नाही. या संदर्भात चौकशी करण्यात येईल,' असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख