धनंजय मुंडे तळ ठोकून, पण जिल्हा बॅंकेत यश मिळेल का? - Dhananjay Munde Stay In Beed, but will the District Bank succeed? | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे तळ ठोकून, पण जिल्हा बॅंकेत यश मिळेल का?

दत्ता देशमुख
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक कार्यक्रम सुरु झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवशी सोमवार पर्यंत तब्बल २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये तळ ठोकून होते. मागच्या वेळी विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. आता मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आता निवडणुक झाली तरी राष्ट्रवादीला यश मिळेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदतीदिवशी एकूण २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. येत्या २० मार्चला मतदान आणि २१ मार्चला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. 

दरम्यान, सध्या बँकेवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आहे. नऊ वर्षांपूर्वी कर्जवाटपातील अनियमिततेमुळे बँकेची आर्थिक घडी पुर्णत: विस्कळली होती. त्यानंतर सहा वर्षांपूर्वी संचालक मंडळाची निवडणुक झाली. त्यावेळीही विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनेही निवडणुक लढविली. मात्र, त्यांना सपाटून मार खावा लागला.

त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस भाजपच्या मांडवात होते. आता लागलेल्या निवडणुकीतही क्षीरसागरांचा कल भाजपकडेच आहे. दरम्यान, मतदार यादीवर नजर टाकली तर भाजपलाच यशाची संधी अधिक वाटते. सेवा सोसायटीचे चार आणि इतर एखाद दुसरा मतदार संघातून राष्ट्रवादी विजयी होऊ शकते.

दरम्यान, निवडणुकीच्या दृष्टीने मागच्या आठवड्यात मुंबईत पंकजा मुंडे यांनी बैठक घेतली. या बैठकीला जयदत्त क्षीरसागर यांच्यासह रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, सुभाष सारडा आदींची उपस्थिती होती. तर, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे आदींचीही पुर्वतयारीची बैठक झाली.

तरीही, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धनंजय मुंडे शासकीय विश्रामगृहावर तळ ठोकून होते. आता निवडणुकीत मागच्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यात धनंजय मुंडे यांना यश येते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख