धनंजय मुंडेना सांगूनही कोरोना काळातील भ्रष्टाचाराची चौकशी नाही- नमिता मुंदडा

केवळ माझ्या मतदारसंघातील रस्ते बंद करणे म्हणजे माझ्यावर राजकीय सूड उगवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप देखील नमिता मुदंडा यांनी केला.
Bjp Mla Namita Mundada-Minister Dhnanjay Munde-beed News
Bjp Mla Namita Mundada-Minister Dhnanjay Munde-beed News

बीड : माझ्या मतदारसंघातील केज उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणल्यावर देखील दोषींवर कारवाई केली जात नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देखील या संदर्भात सगळी माहिती देऊन कारवाईची मागणी केली, मात्र त्यांनीही काहीच केले नाही, असा आरोप केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी आज विधीमंडळात केला. माझ्या मतदारसंघातील अनेक विकासकामे रद्द करत राजकीय सुड उगवला जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या मतदारसंघातील तक्रारींचा पाढा वाचला. कोरोनाची भिती दाखवून या काळात केज उपजिल्हा रुग्णालयात ४४ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सात स्क्रीन बसवण्यात आले. परंतु याची बाजारभावा प्रमाणे फक्त ३ ते ४ लाख रुपये किंमत आहे.

त्यासाठी तब्बल २५ लाख खर्च करण्यात आल्याचा मुद्दा मुंदडा यांनी उपस्थित केला. तसेच लोखंडी सावरगांव येथील कोविड सेंटरमध्ये देखील एवढाच खर्च सीसीटीव्ही बसवण्यावर खर्च करण्यात आला आहे. ५० लाख रुपये खर्चून आज एकही सीसीटीव्ही कॅमेरा तिथे सुरू नाही, याचे पत्रच मला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

कोरोना काळात बीड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला पण तो असा चुकीच्या पद्धतीने खर्च करून गैरव्यहार करण्यात आला. या संदर्भात बीड येथे पालकमंत्र्यांच्या एक दोन बैठकांमध्ये मी हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली. मात्र पालकमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही त्या म्हणाल्या.

साडेचार हजारांची खुर्ची वीस हजारांना..

सीसीटीव्ही प्रमाणेच अंबाजोगाई नगर पालिकेत मुकुंदराज सभागृहाच्या दुरुस्तीमध्ये ज्या खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत, त्या देखील गैरव्यवहार झाला आहे. एक खुर्ची तब्बल २० हजार रुपयांना औरंगाबाद येथून खरेदी करण्यात आली आहे. मी जेव्हा या खुर्च्यांच्या किंमतीचा माहिती घेतली, कोटेशन मागितले तर तीच खुर्ची मला साडेचार हजार रुपयांत मिळाली.

नवी मुंबईत या खुर्चीची किंमत सात हजार रुपये आहे. शहरानूसार भाव बदलत असले तरी अंबाजोगाई नगरपालिकेने केलेली खरेदी व मुळ किंमत यात मोठी तफावत आहे. या खुर्ची खरेदीवर दीड कोटी रुपये नगरपरिषदेने खर्च केले आहेत. या खरेदी व निविदा प्रक्रियेची राज्यस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील नमिता मुंदडा यांनी केली.

८२ ग्रामीण रस्त्यांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ३४ रस्ते हे कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहेत. यातील २४ रस्ते हे माझ्या मतदारसंघातील आहेत. रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, लोकांना दळणवळणाची सोय राहिलेली नाही, रस्ते खराब असल्यामुळे अनेक गावातील बस फेऱ्या रद्द झालेल्या आहेत.

असे असतांना केवळ माझ्या मतदारसंघातील रस्ते बंद करणे म्हणजे माझ्यावर राजकीय सूड उगवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप देखील नमिता मुदंडा यांनी केला. तसेत तातडीने रस्त्यांच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com