देशमुख काका-पुतण्याच्या समर्थकांची जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षपदी वर्णी

लातूर जिल्हा काँग्रेस समितीच्या जिल्हाध्यक्षपदी माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांचे खंदे समर्थक श्रीशैल्य उटगे तर शहराध्यक्षपदी पालकमंत्री अमित देशमुख यांचे समर्थक ॲड. किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
latur congress district and city president apooint news
latur congress district and city president apooint news

लातूर-  लातूर जिल्हा काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खांदेपालट केली आहे. लातूर जिल्हा काँग्रेस समितीच्या जिल्हाध्यक्षपदी माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांचे खंदे समर्थक श्रीशैल्य उटगे तर शहराध्यक्षपदी पालकमंत्री अमित देशमुख यांचे समर्थक ॲड. किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, दिवंगत नेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजीमंत्री दिलीपराव देशमुख अशा ज्येष्ठ नेत्यांचा हा जिल्हा. या जिल्ह्यात पक्षात महत्वाच्या पदावर काम करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

विद्यमान जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे हे गेली दहा वर्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिले. २०१० पासून ते जिल्हाध्यक्ष आहेत. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे ते कट्टर समर्थक. गेल्या दहा वर्षात  बेद्रे यांनी अनेक चढउतार पाहिले. विलासराव हे राज्याचे मुख्यमंत्री असताना बेद्रे यांना चांगले काम करता आले. जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यासोबत काम करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. पक्षांतर्गत मतभेद होणार नाहीत याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. पण त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी अडचणीचाही ठरला.

गेल्या काही वर्षात मात्र ते राजकारणापासून अलिप्तच राहिले. २०१७ मध्ये तर त्यांनी पक्षाकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तो नामंजूर केला होता. त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपद कायम ठेवले होते. त्यानंतर ते पुन्हा सक्रीय झाले. आता त्यांचा दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची वर्णी लावली आहे.

उटगे हे मीतभाषी आहेत. माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यासोबतच पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सारख्या तरुण नेतृत्वासोबत त्यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेल्या सहा वर्षापासून पक्षाचे शहराध्यक्षपद मोईज शेख यांच्याकडे होते.

अल्पसंख्याक समाजातील अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांची ही निवड करण्यात आली होती. ती त्यांनी सार्थही ठरवली. पालकमंत्री अमित देशमुख यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. पण आता त्यांच्या जागी तरुणाला संधी देण्यात आली आहे.

गेली काही वर्ष विधी सल्लागार म्हणून काम करणारे ॲड. किरण जाधव यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कायद्याचा चांगला अभ्यास असणाऱ्या जाधव यांना आता शहरात पक्ष वाढीसाठीही सर्वाना सोबत घेवून काम करावे लागणार आहे. ते कशापद्धतीने काम करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com