शिवसेनेला मानाचे ताट पण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणाऱ्यांच्या नावावरच काट - Cut in the name of those who demand it from the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

शिवसेनेला मानाचे ताट पण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणाऱ्यांच्या नावावरच काट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मार्च 2021

या निमित्ताने शिवसेनेच्या एका गोटात गुदगुल्या तर एका गोटात खदखद आणि पुन्हा एकदा तक्रारींचा पाढाही सुरु झाला आहे. 

बीड : जिल्हा नियोजन समिती आणि कार्यकारी समितीच्या निवडीत शिवसेना आणि काँग्रेसला भरभरुन वाटा मिळाला आहे. पण, शिवसेनेला मानाचे ताट देतानाच थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणाऱ्या आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीला आव्हान देणाऱ्या गटाच्या नावावर मात्र काट अशी पॉलिटीकल थेअरी साधत राज्यात शिवसेना मोठा भाऊ असला तरी इथे सत्ता आमचीच असा संदेश या निमित्ताने राष्ट्रवादीने दिला आहे. 

विशेष म्हणजे शिवसेनेच्या एका गटाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलेल्या मागणीनंतर त्यांच्या कार्यालयाने याबाबत संबंधीतांनी निर्देशही दिलेले आहेत. त्यामुळे या निमित्ताने शिवसेनेच्या एका गोटात गुदगुल्या तर एका गोटात खदखद आणि पुन्हा एकदा तक्रारींचा पाढाही सुरु झाला आहे. 

राज्य शासनाच्या नियोजन विभागाने बुधवारी जिल्हा नियेाजन समिती आणि कार्यकारी समितीची घोषणा केली. या विभागाच्या कक्ष अधिकारी वीणा रानडे यांच्या स्वाक्षरीने सदर आदेश निर्गमित झाले. यामध्ये राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसच्या निष्ठावंतांना न्याय मिळाल्याचे यादीवरुन दिसते. बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हा नियोजन मंडळाची घोषणा केली 

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार झालेल्या जिल्हा नियेाजन समितीमध्ये विधान मंडळ सदस्यांमधून आमदार प्रकाश सोळंके व बाळासाहेब आजबे यांची नेमणूक झाली आहे. तर, नामनिर्देशीत सदस्यांमध्ये मुंडेंचे अगदीच निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यासह शिवसेनेचे अभयकुमार ठक्कर यांची निवड झाली आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांना नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्यासह कार्यकारी समितीवरही विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनाही स्थान दिले आहे. जिल्हा नियोजन समितीला सहाय्य करण्यासासाठी नियोजन समिती अध्यक्ष (पालकमंत्री) असलेली ही कार्यकारी समिती काम करते.

या समितीवरही प्रकाश सोळंके नामनिर्देशित तर आमदार संदीप क्षीरसागर विशेष निमंत्रीत सदस्य आहेत. तर, वाल्मिक कराड नामनिर्देशित सदस्य आहेत. यासह जिल्हा नियोजन समितीवर बाबुराव पोटभरे, शेख समशेर शेख शब्बीर, सयाजी शिंदे, मुंडेंचे निकटर्वीय राजपाल लोमटे, सुनिल वाघाळकर, महादेव धांडे, दादासाहेब मुंडे आणि वैजिनाथ सोळंके यांचा समावेश आहे. 

बीड, परळी, अंबाजोगाईला झुकते माप

दरम्यान, यादीवर नजर टाकल्यानंतर पॉलिटीकल थेअरी जुळवत शिवसेना व काँग्रेसचाही सन्मान राष्ट्रवादीने केला. पण, भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर परळी, बीड व अंबाजोगाईलाच अधिक वाटा आहे. त्याखालोखाल माजलगावला दोन असले तरी गेवराई व आष्टीकरांचे समाधान एकावरच झाले आहे.

शिवसेनेने सचिन मुळूक, अनिल जगताप आणि अभयकुमार ठक्कर अशा निष्ठावंतांना आणि आणि काँग्रेसनेही महादेव धांडे, सुनिल वाघाळकर अशा निष्ठावंतांना संधी दिली आहे. दादासाहेब मुंडे यांचेही काँग्रेस प्रवेशाचे आणि मुंडेंच्या जवळीकीचे चीज झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख