जिल्हा बॅंकेतील वादावर पडदा, सत्तार-दानवे अध्यक्ष-उपाध्यक्षाला घेऊन मुंबईला - Curtain on the controversy in the District Bank, Sattar-Danve took the President-Vice President to Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेतील वादावर पडदा, सत्तार-दानवे अध्यक्ष-उपाध्यक्षाला घेऊन मुंबईला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

सत्तार यांच्या मनासारखे झाल्यानंतर त्यांनी आता पॅचअप करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भुमरे- दानवे यांच्यात बिनसले होते. शिवसेनेत दुफळी माजल्याचे चित्र यावरून समोर आले होते. मात्र या वादावर आता पडदा पडला आहे. सत्तार-दानवे यांनी दोघांनी मिळून जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जून गाढे यांना मुंबईत नेऊन पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घडवून आणली. मंत्रालयातील दालनात देसाई यांनी दोंघानीही शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा बॅंकेत एक-दोन संचालक असलेल्या शिवसेनेने या निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी घेत थेट बॅंकच ताब्यात घेतली. शिवसनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली आणि अध्यक्षासह उपाध्यक्षही शिवसेनेचा झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा बॅंकेवर भगवा फडकला असे बोलले जाते. दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अध्यक्षाची निवड बिनविरोध झाली तरी उपाध्यक्ष पदावरून चांगलेच नाट्य रंगले होते.

अब्दुल सत्तार यांनी उपाध्यक्ष पदी देखील आपल्याच मर्जीतील व्यक्ती बसवायची होती. त्यामुळे भुमरे- दानवे यांनी पाठिंबा दर्शवलेल्या कृष्णापाटील डोणगांवकर यांच्या उमेदवारीला सत्तार यांनी कडाडून विरोध केला होता. उपाध्यक्ष पदाची निवडणुकीही बिनविरोध व्हावी, अशी सत्तार यांची इच्छा होती. पण त्याला डोणगांवकरांची उमेदवारी आणि दानवे-भुमरे यांच्या पाठिंब्याने सत्तार यांचा प्रयत्न फोल ठरला. पण संभाव्य धोका ओळखत सत्तार यांनी थेट विरोधक डाॅ. कल्याण काळे, माजी आमदार सुभाष झांबड या काॅग्रेसच्या जुन्या मित्रांची मदत घेतली आणि अर्जुन गाढे यांना १३ विरूद्ध ७ मतांनी निवडून आणले.

परंतु भुमरे- दानवे यांनी सत्तार यांच्या विरोधात भूमिका घेऊन बॅकेंतून निघून गेल्याने सत्तार यांचा पारा चढला होता. उपाध्यक्ष पदी गाढे यांची निवड झाल्यानंतर सत्तार यांनी डोणगांवकर यांच्यावर गद्दारीचा आरोप करत शिवसेनेच्या नेत्यांनी मदत केली नाही असा आरोप केला होता. त्यांचा रोख रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे यांच्याकडे होता. भविष्यात याची फळे भोगावी लागतील, असा दम देखील सत्तार यांनी भरला होता. जिल्हा बॅंकेसाठी एकत्र आलेल्या सत्तार- भुमरे- दानवे यांच्यात मतक्षेद झाल्याचे समोर आले होते.

भुमरेंची गैरहजेरी..

मात्र सत्तार यांच्या मनासारखे झाल्यानंतर त्यांनी आता पॅचअप करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झालेले भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांची सत्तार यांनी नितीन पाटलांसह त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे देखील नितीन पाटील यांना आशिर्वाद घेण्यासाठी सत्तार यांनीच पाठवल्याची चर्चा आहे.

त्यानंतर आता नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जून गाढे यांना घेऊन अब्दुल सत्तार- अंबादास दानवे हे दोघेही मुंबईला गेले होते. मंत्रालयात पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी देसाई यांचे आशिर्वाद घेतले. त्यामुळे सत्तार-दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे बोलेले जाते. रोहयो मंत्री संदीपान भुमरे मात्र यावेळी सोबत नव्हते. यावरून मात्र संशयाचे वातावरण कायम आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख