Criticism of curfew by NCP; Shiv Sangram says do you want to make Beed district corona? | Sarkarnama

राष्ट्रवादीकडून संचारबंदीवर टिका; शिवसंग्राम म्हणते बीड जिल्हा कोरोनाग्रस्त करायचाय का?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 मे 2020

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या थांबविण्यासाठी पाच दिवसांचा कर्फ्य लागू करावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली होती. आता राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या भूमिकेवरुन शिवसंग्रामचे प्रभाकर कोलंगडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

बीड : लॉकडाऊनमधील संचारबंदीवरुन शिवसंग्राम आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार सय्यद सलिम यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बीडसह ग्रामीण भागात लागू केलेली संचारबंदी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांना संपूर्ण बीड जिल्हा कोरोनाग्रस्त करायचाय का? असा सवाल केला आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या रोखण्यासाठी जिल्ह्यात किमान तीन आणि कमाल पाच दिवसांची संचारबंदी लागू करावी, असे पत्र आमदार विनायक मेटे यांनी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

पुढच्या काही दिवसांत पावसाळ्यातील आजार व शाळा महाविद्यालयांवर लक्ष द्यावे लागणार असल्याने हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी म्हटले हेाते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीतील शिथिलतेत अनेक मर्यादा दिल्या होत्याच. जिल्हा पुर्वपदावर येत असतानाच दोन दिवसांपूर्वी एक कोरोना रुग्ण शहरातील काही दवाखाने व तपासणी केंद्रात जाऊन आला.

त्याच्या संपर्कात बीड शहरासह जिल्ह्यातील इतर १२ गावांतील पावणेचारशे लोक आले. संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईनन देखील करण्यात आले. यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बुधवारच्या मध्यरात्रीपासून ४ जुनपर्यंत बीड शहरासह इतर १२ गावांत पूर्णवेळ संचारबंदीचे आदेश लागू केले.

यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार सय्यद सलिम यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन देत सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहेत. शासनाने  १९ मे रोजी लॉकडाऊन संदर्भात मार्गदर्शक सुचनांनुसार रेड व नॉन रेड झोन हे दोन विभाग केले आहेत. बीड जिल्हा हे नॉन रेड झोनमध्ये आहे.

नॉन रेडझोनमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार बाजार व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील, व राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या परवानगीशिवाय जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध कोणतेही आदेश देता येणार नाहीत असे स्पष्ट नमुद केले आहे.असे असतांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बीड शहर व बीड तालुक्यातील काही गावांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन व वेळेची शिथीलता न देता कर्फ्यु लावण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश शासनाच्याच आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. सामान्यांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यावर शिवसंग्रामचे नेते प्रभाकर कोलंगडे यांनी सत्ताधाऱ्यांना पूर्ण बीड जिल्हा कोरोनाग्रस्त करायचा आहे का? असा टोला लगावला आहे.

संचारबंदी हाच रामबाण ईलाज आहे. आपला जिल्हा हा ग्रीन झोन राहावा, रेड झोनमध्ये जाऊ नये याकरिता जिल्हाधिकारी व त्यांची सर्व टीम दिवसरात्र मेहनत घेत आहेत. दक्ष राहून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत आहेत. जेणेकरून बीड जिल्ह्यामधील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. किंवा झालेला आहे तो पसरू नये. तो आटोक्यात राहून संपवा.

सत्ताधाऱ्यांना ही दुर्बुद्धी कशी...

यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणा कार्यरत असताना त्यांनी काही राज्य शासनाच्या सहमतीने निर्णय घेतलेले असताना त्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी साथ द्यायचे काम सत्ताधारी पक्षाने करण्याऐवजी प्रशासनाच्या विरोधातच सत्ताधारी लोक कोर्टात जायची धमकी देत आहेत. शासनाच्या विरोधातच येथील माजी आमदार काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्ण शहरभर फिरल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकार्यांनी काल मध्यरात्री बीड शहर आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सत्ताधाऱ्यांना पूर्ण जिल्हा कोरोनाग्रस्त करायचा आहे का? जिल्ह्याची काळजी घेण्याचे काम जिल्हाधिकारी करत असताना त्यांना विरोध करण्याचे काम ह्यांना करायचे आहे का? असा आरोपही प्रभाकर कोलंगडे यांनी केला. सत्ताधाऱ्यांना ही दुर्बुद्धी कशी सुचते असा सवालही त्यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख