कोरोनाने पतीचा मृत्यू, पत्नीनेही चिमुकल्यासह संपवले जीवन - Corona's husband's death, wife's life ended with a child | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोनाने पतीचा मृत्यू, पत्नीनेही चिमुकल्यासह संपवले जीवन

संतोष जोशी
गुरुवार, 15 एप्रिल 2021

हजारोंनी रुग्णांची संख्या वाढते आहे. तर मृ्त्यू दरात देखील धडकी भरवणारी वाढ झाली आहे.

नांदेड ः नांदेडमध्ये ह्दय पिळवटून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोरोनाने आजारी असलेल्या पतीचे निधन झाल्याचे कळताच हे दुःख सहन न झाल्याने  त्याच्या पत्नीने आपल्या चिमुकल्यासह आयुष्य संपवले. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाचा कहर वाढतो आहे, या महामारीने नात्यांमधील अंतर वाढवले, माणुसकीला लाजवले. चालता-बोलता माणसं जावी असेच काहीसे सुरू आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच कोरोनाने आपल्या कव्हेत घेतले आहे.

कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा भयानक आणि प्रभावी असल्याचे दररोज आढळत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाणा पाहून दिसून येत आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तर हजारोंनी रुग्णांची संख्या वाढते आहे. तर मृ्त्यू दरात देखील धडकी भरवणारी वाढ झाली आहे.

राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर या महामारीशी दोन हात करत आहे, पण रुग्ण संख्या अधिक आणि उपलब्ध व्यवस्था तोडकी अशी परिस्थिती असल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचं कळताच पतीचा विरह सहन न झाल्यानं पत्नीनं तीन वर्षाच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन जिवनयात्रा संपवली..तेलंगणातून उदरनिर्वाहासाठी लोह्यात आलेले हनुमंत शंकर गदम कुटुंबासह राहत होते.

दरम्यान हनुमंतला कोरोनाचा संसर्ग झाला, उपचार सुरू असताना काल त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाची माहिती कानावर पडताच पत्नी पद्मा यांना धक्काच बसला. यातूनच पद्मा यांनी तीन वर्षाच्या मुलासह  जवळच असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.  या प्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख