राज्यमंत्री बनसोडे यांच्या दौऱ्यात कोरोनाचे नियम धाब्यावर; भाजपकडून कारवाईची मागणी - Corona rules during Minister of State Bansode's visit; BJP demands action | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

राज्यमंत्री बनसोडे यांच्या दौऱ्यात कोरोनाचे नियम धाब्यावर; भाजपकडून कारवाईची मागणी

दिपक क्षीरसागर
शुक्रवार, 12 मार्च 2021

राज्यमंत्र्यांच्या स्वागताला त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंग, मास्क या नियमांचे पालन कुणीही करतांना दिसत नव्हते.

लातूर ः जिल्ह्यातील उदगीर इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नियोजित दौरा होता. दिवसभर त्यांचे भरगच्च कार्यक्रम होते, दरम्यान सकाळी शहरातील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. राज्यात व लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसख्येत वाढ होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली यावेळी सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला. अनेक नागरिकांच्या तोंडाला मास्क देखील नव्हते.

राज्यासह मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. पुन्हा लाॅकडाऊन लावावा की काय? याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक, सांस्कृतिक व कुठल्याही प्रकारच्या राजकीय कार्यक्रमांवर बंंदी घातली आहे. पण त्यांच्याच मंत्री्मंडळातील काही मंत्री कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसून आले आहे.

संजय बनसोडे यांच्या उदगीर दौऱ्यात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात होता, परंतु राज्यमंत्र्यांच्या स्वागताला त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंग, मास्क या नियमांचे पालन कुणीही करतांना दिसत नव्हते.

जिल्ह्यात संचारबंदी सारखी परिस्थिती आहे, लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. जमावबंदीचे आदेश आहेत, असे असतांना राज्यमंत्र्यांनीच जाहीर कार्यक्रम घेऊन गर्दी जमवणे कितपत योग्य आहे, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी पीबी पृथ्वीराज यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या मागे किती पदाधिकारी, कार्यकर्ते आहे हे तपासून पाहण्यासाठीच राज्यमंत्र्यांकडून हे शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याची टीकाही भालेराव यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख