भूम-परांडा मतदारसंघात कोरोनाचे संकट, आजी-माजी आमदार मात्र गायब..

निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतांना भूम-परांडा मतदारसंघातील या गांवाना बार्शी या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यावर विसंबून राहावे लागते हे भूषणावह निश्चितच नाही.
Osmanabad- Bhum-Paranda- Mla Tanaji Sawant, Ex Mla Rahul Mote News
Osmanabad- Bhum-Paranda- Mla Tanaji Sawant, Ex Mla Rahul Mote News

उस्मानाबाद : भुम- वाशी- परंडा मतदार संघात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारा आपापल्या भागावर लक्ष ठेवून आहेत. तेथील सर्वसामान्य नागरिक, कोरोनाबाधित रुग्णांसाठी धडपडत आहेत. भूम- परांडा मतदारसंघात मात्र सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार प्रा. तानाजी सावंत, आणि सध्या आमदार नसले तरी त्यांच्या पक्षाचे सरकार आणि तिथे वजन असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे हे दोघेही गायब असल्याचे चित्र आहे.

संकटाच्या काळात गेली अनेक वर्ष सत्ता आणि पद भूषवणारे हे नेते दिसेनासे झाल्याने सर्वसमान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दोघेही महाविकास आघाडीचे वजनदार नेते आहेत, तरीही या भागातील लोकांना दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.  बार्शीतल्या आमदारांनी याबाबत नुकतेच विधान करत भुम-परांड्याच्या या आजी-माजी आमदारांचे कान टोचले. आता तरी या नेत्यांना जाग येणार का?  असा संतप्त सवाल मतदारसंघातील नागरिक  विचारत आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील हे तीन तालुके सोयी-सुविधाच्या बाबतीत आधीपासूनच वंचित राहिले आहेत. गेल्या वीस दिवसांत या तीनही तालुक्यात दररोज शंभर ते सव्वाशे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आता हा आकडा दिडशे ते पावणे दोनशेपर्यंत गेला आहे. भूम येथे रुग्णालय असले तरी तिथे सुविधांची वानवा आहे. परंडा येथील स्थिती तर यापेक्षा बिकट आहे.

साध्या आजारावरील औषधोपचारासाठी सुध्दा येथील नागरीकांना बार्शी गाठावे लागते. मतदारसंघातील लोकप्रतिनिधींची उदासिनता याला कारणीभूत आहे. मतदारसंघ सोडून बार्शीला उपचारासांठी जावे लागत असल्याने तेथील बाजारपेठ वाढली, तिथे सुविधा आल्या, त्या तालुक्याचा विकासाला गती आली. पण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतांना भूम-परांडा मतदारसंघातील या गांवाना बार्शी या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यावर विसंबून राहावे लागते हे भूषणावह निश्चितच नाही.

सीना कोळेगाव व्यतिरिक्त एकही मोठा प्रकल्प या भागात आजी-माजी आमदारांना इतक्या वर्षात आणता आला नाही. सध्या राज्यात व मराठवाड्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, इंजेक्शन, आॅक्सिजन, बेड्सचा प्रंचड तुटवडा निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या आणि आणीबाणीच्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची खरी गरज आहे.

सरकार दरबारी वजन कधी वापरणार?

मतदारसंघातील लोक सध्या चोहोबाजूने आलेल्या संकाटामुळे हैराण आहेत.  राज्यातील सत्तेचा मतदारसंघातील जनतेसाठी पुरेपूर वापर करण्याची ताकद आमदार प्रा.तानाजी सावंत यांच्यासारखा वजनदार नेत्यामध्ये आहे. मात्र अशा आपत्तीच्या काळात सुध्दा त्यांचे पाय मतदारसंघाला लागत नाही, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

तर दुसऱ्या बाजुला तीन टर्म आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना या मतदारसंघातील गावांची इत्यंभूत  माहिती आहे, येथील समस्या त्याना चांगल्या अवगत आहेत.  त्यांचाही वावर कमी झाल्याचे चित्र आहे.

फिरण्यासाठी व यंत्रणा कामाला लावण्यासाठी काही मर्यादा असतील हे मान्य केले, तरी किमान राज्य सरकारची मदत घेऊन तेथे रुग्णांच्या सोयीसाठी एखादी तरी उपाययोजना होणे अपेक्षित होते. त्यांच्या मागणीला राज्य सरकारच्या मंत्र्यानीही सकारात्मक प्रतिसाद दिला असता, पण असे काहीच घडलेले नाही.

आमदार प्रा.सावंत यांनी मनात आणले तर या तीनही तालुक्याच्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचारांसाठी जाण्याची गरज भासणार नाही.  इतर भागातील आमदार आपापल्या मतदरासंघात मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा देताना स्वतः खर्च उचलत आहेत.  पण या भागातील जनतेच्या नशीबी मात्र बार्शीवर विसंबुन राहायची वेळ लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणा मुळे आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com